Published On : Tue, Feb 26th, 2019

पवार किंवा चव्हाणांनी नागपुरातून लोकसभा लढवावी : प्रकाश आंबेडकर

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पुढील पंतप्रधान म्हणून नितीन गडकरी यांचे नाव समोर केले जाणार असल्याची चर्चा आहे. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आहे तर अशोक चव्हाण हे राज्यात काँग्रेसचे नेतृत्व करतात. या नेत्यांनी नागपुरातील उमेदवार घोषित करावा किंवा संघाचे विरोधक म्हणून दोघांपैकी एकाने नागपुरातून लोकसभा निवडणूक लढवावी, असे आव्हानच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

नागपुरातील रविभवन येथे ते मंगळवारी पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते. भाजपा व संघ हे आक्रमक हिंदुत्ववादी आहे. मात्र कॉंग्रेस पक्षदेखील ‘सॉफ्ट’ हिंदुत्ववादी झाला आहे. काँग्रेस व भाजपा या दोघांचाही ‘अजेंडा’ सारखाच आहे. मागील विधानसभा निवडणुकांत राहुल गांधी यांनी कॉंग्रेस जानवेधारी आहे हे दाखवून दिले. आमच्याकडे आता फार कमी पर्याय उरले आहेत. मनुवाद्यांच्या विरोधातील आमचा लढा कायम असेल. जर कॉंग्रेसला आमच्याशी आघाडी करायची असेल तर त्यांनी संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याची भूमिका घ्यावी, अशी आम्ही बाजू मांडली होती. मात्र काँग्रेसने अद्यापही यावर मौन साधले आहेत. आमची व त्यांची ‘व्हेवलेंथ’ मिळालेली नाही. मात्र कॉंग्रेस व संघाची ‘व्हेवलेंथ’ मिळालेली दिसून येत आहे. काँग्रेसचे नेते जागा वाटपावरच अडून बसलेले आहे. आमच्यासाठी जागावाटप हा गौण मुद्दा आहे.

Advertisement

आमच्या मुद्यांवर कॉंग्रेस बोलणार नसेल तर आघाडी होणार नाही, असे दिसून येत आहे. नाईलाजाने १ मार्चपर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्याच मतदारसंघातील उमेदवार जाहीर करावे लागतील, असे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

आम्ही भाजपाची ‘बी टीम’ असल्याचा आरोप केला जात आहे. आम्ही कधीही त्यांच्यासोबत सत्तेत गेलो नाही. काँग्रेसशी लढत राहिलो, पण भाजपासोबत गेलो नाही. आरोप करणाऱ्यांनी कॉंग्रेससोबत हातमिळावणी केली होती, याचा विसर पडू नये, असेदेखील अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले.

‘सर्जिकल स्ट्राईक-२’चे केले स्वागत

भारतीय वायुसेनेने दहशतवादी तळांवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’चे प्रकाश आंबेडकर यांनी स्वागत केले आहे. आमच्याकडे कुणी वाईट नजरेने पाहिले तर काय प्रत्युत्तर मिळू शकते हे या हल्ल्यातून दिसून आले आहे. पाकिस्तानला योग्य धडा मिळाला आहे. यापुढे पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यावर भर देण्याची गरज आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने पाकिस्तानची कोंडी केली पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

Advertisement
Advertisement
Advertisement