Published On : Tue, Feb 26th, 2019

नासुप्रचा 521 कोटींचा अर्थसंकल्प,अनधिकृत ले-आऊट विकासासाठी 29 कोटींची तरतूद

फुटाळ्यात संगीत कारंजे लाईटसाठी 100 कोटी

नागपूर: नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्‍वस्त मंडळाने आज 521 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. अर्थसंकल्पात फुटाळा येथे संगीत कारंजे लाईट व लेजर मल्टिमिडिया शोसाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अनधिकृत ले-आऊटमधील मंजूर, नामंजूर ले-आऊटमध्ये विकास कामांसाठी 29 कोटींची तरतूद करीत नासुप्रने सामान्य नागरिकांचा दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्‍वस्त मंडळाची बैठक आज नासुप्र कार्यालयात पार पडली. या बैठकीत सभापती शीतल उगले, विश्‍वस्त व स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, विश्‍वस्त भूषण शिंगणे आदी उपस्थित होते. यावेळी 2019-20 या वर्षाच्या 521.68 कोटींच्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली. अर्थसंकल्पात अपूर्ण कामाच्या देयकांसाठी तसेच विविध रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी 38 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. उद्यान विकास वृक्षारोपण व सौंदर्यीकरणासाठी साडेतीन कोटी रुपयांचा खर्च या वर्षात करण्यात येणार आहे. नासुप्रचा तसेच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या फुटाळा येथील संगीत कारंजे लाईट व लेझर मल्टिमिडिया शोसाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली. या प्रकल्पामुळे नागपूरच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. नागपूरकरांसाठी आणखी एक विरंगुळ्याचे केंद्र तयार होणार आहे. दलित वस्ती सुधार योजनेसाठी 20 कोटी, ताजबागजवळील हरपूर स्पोर्टस कॉम्प्लेक्‍ससाठी 10 कोटी, मानेवाडा ई-लायब्ररीच्या आधुनिकीकरणासाठी 5 कोटी, उमरेडवरील इंद्रायणी हॅन्डलूम येथील इमारत बांधकामासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद नासुप्रने केली. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, निवृत्ती वेतनासाठी 90 कोटींची तरतूद करण्यात आली.

मैदानांच्या विकासासाठी 50 कोटी

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच खासदार क्रीडा महोत्सवादरम्यान प्रत्येक वस्त्यांमध्ये मैदानाच्या विकासाची घोषणा केली होती. नासुप्रनेही मैदानांच्या विकासासाठी 50 कोटींची तरतूद केली.

गृहबांधणी प्रकल्पातून 100 कोटींचे उत्पन्न

572, 1900 ले-आऊटमधून विकास शुल्कापोटी 28 कोटींच्या उत्पन्नाची अपेक्षा नासुप्रने केली असून गृह प्रकल्पातून 110 कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. शासकीय योजनेंतर्गत 76 कोटी मिळण्याची अपेक्षा नासुप्रला आहे.