Published On : Thu, Feb 1st, 2018

स्वच्छता ॲप जनजागृतीसाठी उल्लेखनीय कामगिरी बजावणा-यांचे कौतुक

Advertisement


नागपूर: स्वच्छता सर्वेक्षण २०१८ च्या “टॉप स्वच्छ” शहरांच्या यादीत स्थान मिळवून देण्यासाठी तसेच स्वच्छताॲपबद्दल नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी गठीत विशेष ‘मास्टर ट्रेनर’ आरोग्य निरीक्षकांना मनपा आय़ुक्त अश्विन मुदगल यांनी गुरुवारी (ता. १ फेब्रुवारी) सुखद धक्का दिला. मनपा आय़ुक्तांनी स्वतःच्या दालनात निरीक्षकांना गुलाबपुष्प व मिठाई देऊन सन्मानित केले. आय़ुक्तांच्या या सुखद धक्क्याने सर्व आरोग्य निरीक्षकही गहिवरले. यावेळी नागरिक, नगरसेवक,स्वयंसेवी संस्था व प्रसार माध्यमांबरोबरच स्वच्छता ऍप जनजागृतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणा-या आरोग्य निरीक्षकांचे मनपा आयुक्तांनी कौतुक केले.

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये विविध निकषांवर शहराचे मूल्यांकन केले जात आहे. यामध्ये ४८११३ स्वच्छता ॲप डाऊनलोडिंगचे उद्दिष्ट मनपाला मिळाले होते. हे उद्दिष्ट मनपाने ३० जानेवारी रोजीच पूर्ण केले. यामुळे नागपूर मनपाला ॲप डाऊनलोडमध्ये १५० गुण आणि याॲपवर मिळालेल्या ९० टक्के तक्रारी १२ तासांत सोडविल्याबद्दलचे १५० गुण मिळाले. स्वच्छ सर्वेक्षणात ‘टॉप २०’ स्वच्छ शहरांच्या यादीत येणाऱ्या शहराला अधिक १०० गुण मिळणार होते. हे उद्दिष्टदेखिल सर्व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने मनपाने १९ डिसेंबर २०१७ रोजीच गाठले होते. या यादीत मनपाने १६ व्या क्रमांकापर्यंतदेखिल मजल मारली होती, हे उल्लेखनीय.

नागरिकांना ॲप डाऊनलोड कऱण्यासाठी प्रोत्साहित करणे, तसेच आलेल्या तक्रारी स्वच्छता कर्मचारी यांच्या माध्यमातून सोडविणे आणि इतर कर्मचा-यांना ॲपबद्दल मार्गदर्शन करणे, अशी महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वच्छता निरीक्षकांनी पार पाडली. फलस्वरुप स्वच्छ सर्वेक्षणात मागील वर्षाच्या तुलनेत चांगली कामगिरी केली असल्याचे यावेळी आयुक्त म्हणाले.

स्वच्छ सर्वेक्षणासाठी सर्व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रोत्साहित करणे, त्यांना आलेल्या तक्रारी तातडीने सोडविणे अशा अनेक जबाबदाऱ्या पेलणाऱ्या आणि मोलाची कामगिरी बजावल्याबद्ल अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांचाही गौरव मनपा आयुक्तांनी केला. दिवसभर झालेल्या ॲप डाऊनलोड उपक्रमांवर आधारीत गुणांकन दररोज रात्री १२ वाजता संकेतस्थळावर अपग्रेड केले जात असल्याने पूर्ण उपक्रमाची उत्तम पद्धतीने ट्रॅकिंग केल्याबद्दल अनित कोल्हे यांचाही सत्कार करण्यात आला. सन्मानित करण्यात आलेल्या स्वच्छता निरीक्षकांमध्ये ऋषिकेश इंगळे, संदीप खोब्रागडे, दुर्गेश बक्सरे, अनुप तांबे, कपिल खोब्रागडे, करणसिंग बेहुनिया, मनोज खरे, आनंद बोरकर, रोशन जांभुळकर, विपीन समुद्रे यांचा समावेश आहे.

अन् गहिवरले स्वच्छता निरीक्षक
शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडत असताना १५ वर्षांच्या नोकरीदरम्यान आपल्या कार्याची दखल घेत प्रथमच आपले कौतुक झाल्याबद्दल स्वच्छता निरीक्षकही गहिवरले. त्यांनी आयुक्तांचे आभार मानले. स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान किती ऍप डाऊनलोड झाल्यात , प्राप्त तक्रारी सोडविण्यात आल्यात का , तसेच काम करत असताना येणाऱ्या अडचणी आदींबद्दलची विचारपूस स्वतः आय़ुक्त प्रत्येक स्वच्छता निरीक्षकांना करत होते. वेळोवेळी त्यांना प्रोत्साहित करण्याची भूमिका आयुक्तांची होती, त्यामुळे काम करत असताना आपल्याला ऊर्जा मिळत असल्याचेही स्वच्छता निरीक्षक म्हणाले.