Published On : Sat, Apr 1st, 2017

प्रबोधनात्मक “दोन रेखी वही” ने रसिकांना जिंकले

नागपूर: सामान्य शाळेत एखाद्या दिव्यांगाला दिलेली वागणूक आणि देण्यात आलेले शिक्षण यामुळे किती मोठा बदल त्यांच्या जीवनात घडतो याचे प्रबोधनात्मक सादरीकरण म्हणजे नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे सादर होणारी ‘ दोन रेघी वही..एक प्रवास शिक्षणाकडे’ हि एकांकिका.
शुक्रवार ता 31 मार्च रोजी वसंतराव देशपांडे सभागृहात या एकांकिकेचे सादरीकरण झाले. प्रकाश या मतीमंद मुलाला त्याचे पालक सामान्यांच्या शाळेत शिकवण्याचा निर्णय घेतात. आपल्या “विशेष” असलेल्या मुलाला शाळेत कशी वागणूक मिळेल याचा तणाव या पालकांनाही असतो मात्र त्यांचा निर्धार कायम असतो. लवकरच प्रकाश सामान्य मुलांमध्ये रुळतो, बघता बघता 12 वी चा टॉपर होतो, पुढे उच्च शिक्षण घ्यायला पुण्यात जातो आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर होऊन एका नामांकित कंपनीत मोठया पदावर पोहोचतो. त्याला “बिजनेस एक्सिलेन्स एमप्लोई” हा पुरस्कार मिळतो, माझ्या पालकांनी जर मला सामान्यांच्या शाळेत शिकवण्याचा निर्णय घेतला नसता तर कुठेतरी मी आजहि उपेक्षित जगणं जगत असतो असे मनोगत पुरस्कार स्वीकारताना तो व्यक्त करतो !

“दोन रेघी वही” याचा अर्थ पहिली रेघ ध्येय आणि दुसरी रेघ विश्वास हा संदेश देऊन एकांकिका संपते. नागपूर महानगरपालिकेतर्फे दिव्यांगांना प्रबोधन करणारी महाराष्ट्रातील हि पहिली एकांकिका आहे. एकांकिकेतील प्रकाश हे पात्र जेव्हा ‘ समाजाने माझा स्वीकार केला’ त्याबद्दल आभार मानतो तेव्हा संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गडगडाट त्याचे उस्फुर्त स्वागत करतो आणि येथेच हि एकांकिका रासिकांचे मन जिंकण्यास यशस्वी होते. कार्यक्रमाचा प्रारंभ महापौर नंदाताई जिचकार, शिक्षण सभापती दिलीप दुबे, अति. आयुक्त रविंद्र कुंभारे, उपायुक्त रवींद्र देवतळे, शिक्षण अधिकारी फारुख शेख, डॉ. उदय बोधनकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. विशेष विद्यार्थ्यांनी या नंतर नांदी सादर केली. प्रास्ताविक समन्वयक अभिजित राऊत यांनी केले. लेखिका प्रियंका नंदनवार,संकल्पना अभिजित राऊत, दिग्दर्शन चेतन्य दुबे यांचे होते.निर्मिती सहयोग कलाविष्कार मल्टिमीडिया यांचे होते. नागपूर महानगरपालिका सर्व शिक्षा अभियान- समावेशीत शिक्षणतर्फे सादर झालेल्या या एकांकिकेला रसिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

यांचा झाला सत्कार
यावेळी शिक्षण सभापती दिलीप दिवे व शिक्षणाधिकारी फारुख शेख यांच्या हस्ते उत्कृष्ट मुख्याध्यापक-शिक्षक सन्मान पारितोषिक, उत्कृष्ट विध्यार्थी सन्मान पारितोषिक, उत्कृष्ट विशेष शिक्षक सन्मान पारितोषिक तसेच उत्कृष्ट विशेष तज्ञ सन्मान पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी मंचावर सुप्रसिद्ध नाट्य कलावंत विनोद राऊत, महेश रायपूरकर उपस्थित होते.