Published On : Wed, Apr 4th, 2018

महानिर्मितीला कोळशाचा 15 दिवसांचा साठा राहील एवढा कोळसा पुरवावा : पियुष गोयल


नागपूर: राज्याच्या महानिर्मितीच्या प्रत्येक वीजनिर्मिती केंद्राला 15 दिवसांचा कोळसा स्टॉक पुरविण्याचे निर्देश कोळसामंत्री पियुष गोयल यांनी आज वेकोलिच्या प्रशासनाला दिले. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले.

वेकोलिकडे कोळसा भरपूर प्रमाणात आहे. महानिर्मितीला पुरेल एवढा कोळसा निश्चितपणे पुरवठा करण्याची तयारी यावेळी वेकोलिने दाखविली. नवी दिल्लीत कोळसा मंत्री पियुष गोयल व वेकोलिच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक झाली. या बैठकीला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, खा. कृपाल तुमाने, संचालक श्याम वर्धने उपस्थित होते. कळमना लूपचे काम तातडीने करून महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देशही कोळसामंत्र्यांनी रेल्वे प्रशासनाला दिले.

गोधनी ते कोराडी सध्या एकच ट्रॅक असल्यामुळे कोळसा वाहतुकीत अडचण निर्माण झाली असून कॉड (डबल) लाईनचे काम राहिले आहे. गोधनीपर्यंत हे काम झाले असून त्यापलिकडेचे कामही युध्दस्तरावर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. एप्रिल ते जून या दरम्यान विजेची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासन, कोळसा कंपनी आणि महानिर्मिती यांनी संयुक्त बैठक घेऊन किती कोळशाची आवश्यकता हे ठरवून घ्यावे. येत्या 15 दिवसात 20 लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त कोळसा महानिर्मितीला कोळसा कंपनी आणि रेल्वेने पुरवण्याचे निर्देशही पियुष गोयल यांनी दिले.

याशिवाय ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी गोयल यांच्यासोबत या बैठकीत सावनेर विकास आराखडा, वेकोलिचे आरक्षण, बंद होणार असलेल्या कोळसा खाणींवर चर्चा, भानेगाव बिना पुनवर्सन, नवीन कायदा येण्यापूर्वी संपादन केलेल्या संपादित जमिनींना जुना कायदा लावणे, शेतकर्‍यांना भूसंपादनाचा मोबदला, उमरेडच्या 660 मेगावॉटसाठ़ी वेकोलिची जमीन मिळण्याबाबत, मासेमारीसाठी पॉण्ड तयार करणे, साई मंदिर कामठी कॅन्टॉनमेंट पर्यटन विकास आराखडा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. कोळसा मंत्री पियुष गोयल यांनी या सर्व विषयांवर सकारात्मक भूमिका व्यक्त केली.