मुंबई : राज्यसभेत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची चर्चा राजकीय वर्तुळात गाजत आहे. महाभियोग प्रस्तावाच्या मुद्द्यावरून सुरू झालेली ही सगळी प्रक्रिया आता सरकारच्या रणनीतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरते का, असा सवाल उपस्थित होतो आहे.
जेपी नड्डा आणि रिजिजू गैरहजर का?
सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता उपराष्ट्रपती धनखड यांनी बोलावलेल्या **बिझनेस अॅडव्हायजरी कमिटी (BAC)**च्या बैठकीसाठी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू अनुपस्थित राहिले. त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चा अधिकच तापली. यावर स्पष्टीकरण देताना नड्डा म्हणाले की, ते दोघेही एका अन्य महत्त्वाच्या संसदीय कामात गुंतले होते आणि याची माहिती उपराष्ट्रपती कार्यालयाला आधीच देण्यात आली होती.
‘गुस्सा मत करो’ विधानावरून गोंधळ-
राज्यसभेत सोमवारी नड्डा यांनी दिलेले वक्तव्य – “गुस्सा मत करो भैया, गुस्सा मत करो, रिकॉर्ड में कुछ नहीं जाएगा, मैं जो बोल रहा हूं वही जाएगा” – यावरूनही अनेक तर्कवितर्क रंगले. काहींनी हे विधान उपराष्ट्रपतींसाठी आहे असे गृहित धरले. मात्र, नड्डा यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की हे विधान त्यांनी विरोधकांच्या सततच्या टोमणेबाजीसंदर्भात केले होते, उपराष्ट्रपतींच्या दिशेने नव्हे.
महाभियोगाची ‘गुगली’ कोणाची?
सूत्रांच्या माहितीनुसार, विरोधकांनी न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरोधात अचानक राज्यसभेत महाभियोग नोटीस दिली आणि उपराष्ट्रपतींनी ती स्वीकारल्याने सरकार गोंधळात पडली. लोकसभेत भाजप स्वतः हे पाऊल उचलत होती आणि आपल्या खासदारांकडून सह्या गोळा करत होती. मात्र राज्यसभेत अचानक विरोधकांनीच बाजी मारल्याने सरकारची ‘क्रेडिट’ घेण्याची संधी गमावली गेली.
भाजप खासदारांना न सांगताच घेतल्या सह्या?
या घटनाक्रमानंतर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात भाजपच्या राज्यसभा खासदारांची तातडीने बैठक बोलावण्यात आली. काही खासदारांनी सांगितले की त्यांना काय विषय आहे हे न सांगताच सह्या घेण्यात आल्या. अंदाज असा होता की हे न्यायमूर्ती वर्मांविरोधात आहे. पण तेव्हा पर्यंत उपराष्ट्रपती धनखड यांनी आधीच विरोधकांची नोटीस स्वीकारल्याचे स्पष्ट झाले होते. अशा परिस्थितीत भाजप खासदारांकडून घेतलेल्या सह्यांचे महत्त्वच शिल्लक राहत नाही.
उपराष्ट्रपतींचा राजीनामा – योगायोग की दबाव?
हीच ती सर्वात मोठी चर्चा – उपराष्ट्रपती धनखड यांनी या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजीनामा का दिला? एकेकाळी त्यांच्यावरच महाभियोग आणण्याची भाषा करणाऱ्या विरोधकांनी अचानक ‘क्रेडिट’ घेतल्यावर ते नाराज झाले होते का? की भाजपच्या अंतर्गत रणनीतीतील विसंगतीमुळे त्यांना बाजूला होण्यास भाग पाडले गेले?
दरम्यान उपराष्ट्रपती धनखड यांचा राजीनामा हा केवळ एक वैयक्तिक निर्णय की यामागे गूढ राजकीय गणितं आहेत, हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र, महाभियोगाच्या क्रेडिटसाठी सरकार आणि विरोधकांमध्ये सुरू असलेली ही ‘शह-काटशह’ची लढाई सध्या संसदेच्या इतिहासातील एक नाट्यमय पर्व ठरत आहे.