नागपूर : दिवाळीच्या सणासुदीत वीज बिलावर मोठा झटका! महावितरणने ऑक्टोबर महिन्यातील बिलांसाठी नवीन दर जाहीर केले असून, घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग ग्राहक सर्वांवर याचा परिणाम होणार आहे. प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत वाढ झाल्यामुळे ग्राहकांना सणपूर्वी आर्थिक ताण सहन करावा लागणार आहे.
महावितरणने १ ऑक्टोबरला सर्क्युलर जारी करून सप्टेंबर महिन्यातील वीज वापराबाबत इंधन समायोजन शुल्क आकारण्याचे आदेश दिले आहेत. याआधी १ जुलैपासून वीज दर कमी असल्याचा दावा करून नवीन दर लागू करण्यात आले होते, मात्र ऑगस्टपासून लगेचच इंधन समायोजन शुल्क लागू केले गेले, आणि आता सप्टेंबरसाठीही हे शुल्क वाढवण्यात आले आहे.
यावरून १ ते १०० युनिट वापरलेल्या ग्राहकांना प्रति युनिट ३५ पैसे, तर ५०० युनिटपेक्षा अधिक वापरलेल्या ग्राहकांना ९५ पैसे प्रति युनिट अधिक भरावे लागणार आहेत.
घरगुती ग्राहकांवर भार-
* बीपीएल: १५ पैसे प्रति युनिट
* १–१०० युनिट: ३५ पैसे प्रति युनिट
* १०१–३०० युनिट: ६५ पैसे प्रति युनिट
* ३०१–५०० युनिट: ८५ पैसे प्रति युनिट
* ५०१ युनिटपेक्षा अधिक: ९५ पैसे प्रति युनिट
इतर विशेष परिणाम-
* इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनवर प्रति युनिट ४५ पैसे वाढ
* मेट्रो व मोनोरेलसाठी ४५ पैसे प्रति युनिट वाढ
* शेतकऱ्यांवर प्रति युनिट ४० पैसे अतिरिक्त भार
उद्योग आणि व्यापाऱ्यांसाठी दुहेरी झटका-
उद्योगपती आणि व्यापाऱ्यांवर याचा दुहेरी परिणाम होणार आहे. ३० सप्टेंबर रोजीच ‘कुसुम घटक ब’ निधीसाठी राज्य सरकारकडून औद्योगिक व व्यापारी वीज दरावर ९.९० पैसे प्रति युनिट कर लागू करण्यात आला होता. आता एलटी औद्योगिक कनेक्शनसाठी ४०–५० पैसे प्रति युनिट, तर एचटी औद्योगिक कनेक्शनसाठी ५० पैसे प्रति युनिट इंधन समायोजन शुल्क आकारण्यात आले आहे.
महावितरणने सांगितले आहे की, वीज मागणी वाढल्यामुळे महाग दराने ओपन मार्केटमधून वीज खरेदी करावी लागली आणि अधिक उत्पादन खर्च असलेल्या युनिट्सचा वापर करावा लागला. या अतिरिक्त खर्चाची भरपाई आता ग्राहकांवर इंधन समायोजन शुल्काच्या माध्यमातून केली जात आहे.