नागपूर : नागपूर जिल्ह्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनही उमेदवार विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. माजी मंत्री रमेश बंग, शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे आणि जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांचा यात समावेश आहे.
त्यामुळे जिल्ह्यात पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
.
लोकसभेत मिळालेल्या अपयशानंतर अजित पवार गटातून अनेक जण शरद पवार गटात दाखल झाले. मात्र विधानसभा निवडणुकीत हे चित्र बदलले.
विधानसभेचा निकाल जाहीर होताच सर्वांमध्ये पुन्हा उत्साह संचारला. अजित पवार यांचे 41 आमदार निवडून आले. दुसरीकडे विदर्भात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकाही उमेदवाराला विजय साकारता आलेला नाही. माजी मंत्री रमेश बंग पराभूत झाले, तर अनिल देशमुख यांना मुलाच्या हट्टामुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे.
रमेश बंग यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे राजाभाऊ टांकसाळे, अनिल देशमुख यांचे समर्थक दिलीप पनकुले, सेवा दलाचे अध्यक्ष जानबा मस्के, बजरंगसिंग परिहार यांच्यासह माजी आमदार दीनानाथ पडोळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे. याशिवाय अनेक जण प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे समजते.