
मुंबई : महात्मा बसवेश्वर यांनी भेदभाव विरहित आणि प्रगतीकडे जाणाऱ्या समाजाचा विचार दिला. वीरशैव लिंगायत समाज त्या विचारांचा पाईक आहे. त्यामुळे या समाजाच्या मागण्यांच्या सोडवणुकीबाबत शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. महात्मा बसवेश्वर यांच्या मंगळवेढा येथील प्रस्तावित स्मारकाचे कामही लवकरच सुरु केले जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जाहीर केले.
अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना- शिवा संघटनेच्या वतीने आयोजित महात्मा बसवेश्वर यांच्या ८८७ व्या जयंती द्विपंधरवड्याच्या समारोप तसेच केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंतांच्या सत्कार समारंभात मुख्यमंत्री श्री. फडणवीस शुभेच्छापर मनोगतात बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महात्मा बसवेश्वरांनी मानवतेचा धर्म उभा केला. समाज ज्या काळात कर्मकांड, उच्च-नीच भेदामध्ये अडकलेला होता. अशा काळात त्यांनी मानवतेचा आणि समानतेचा विचार दिला. तोही सोप्या पद्धतीचा. या विचारातून एक राज्य तयार झाले. ज्यामध्ये भेदभावाला थारा नव्हता. स्वातंत्र्य, उन्नती आणि प्रगतीकडे जाणाऱ्या समाजाचा विचार होता. त्यामुळेच आजही शेकडो वर्षांनंतरही आपण महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करतो. त्यांना वंदन करतो. वीरशैव लिंगायत समाज महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा पाईक आहे. त्यामुळे कालौघात या समाजासमोर काही प्रश्न, अडचणी निर्माण झाल्या असतील, तर त्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील. यासाठी चर्चेद्वारे समाजाभिमुख निर्णय घेतले जातील.
सुरुवातीला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवा संघटनेचे अखिल भारतीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार शिवशरण पाटील-बिराजदार यांच्यासह संघटनेचे राज्यभरातील जिल्हा, तालुका स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते.
			









			
			