
नागपूर : राधे मंगलम हॉल ते प्रतापनगर चौक आणि पुढे सावरकर नगर चौकापर्यंत गेल्या वर्षी उन्हाळ्यात करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक केबल टाकण्याच्या कामामुळे सिमेंट रस्ता मोठ्या प्रमाणात उकरण्यात आला होता. मात्र, तब्बल सात महिने उलटल्यानंतरही त्या जागांची पुनर्स्थापना न झाल्याने प्रतापनगर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
या मार्गावरचा सिमेंट रोड नुकताच पूर्ण झाला होता आणि त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. तरीही केबल लाईनसाठी करण्यात आलेल्या HDD ड्रिलिंगमुळे रस्त्याची गुणवत्ता बिघडली असून, महापालिकेकडून किंवा ठेकेदाराकडून दुरुस्तीच्या दिशेने कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
पाण्याच्या पाइपला अनेकदा फोड; नागरिकांचे हाल-
केबल टाकण्याच्या कामादरम्यान केवळ रस्ता नव्हे, तर पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन देखील ३–४ वेळा फुटल्याने उन्हाळ्याच्या काळात परिसरातील लोकांना पाण्यासाठी बेहाल होण्याची वेळ आली. या वारंवार झालेल्या चुका असूनही संबंधित ठेकेदारावर महापालिकेने कारवाई न केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
ठेकेदारावर कारवाई का नाही? तो महापालिकेचा लाडका आहे का?
प्रतापनगर न्यूज ग्रुपच्या (२०० सदस्य) वतीने महापालिका लक्ष्मीनगर झोन आणि पीडब्ल्यूडीच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात नागरिकांनी तिखट सवाल उपस्थित केला आहे—
“काम संपल्यानंतर एका महिन्याच्या आत रस्ता जसा होता तसा रेस्टोर करणे नियमांनुसार आवश्यक आहे. मग इतका काळ विलंब का? ठेकेदार महापालिकेचा लाडका आहे का म्हणूनच त्याच्यावर कारवाई होत नाही का?”
हे निवेदन मुख्यमंत्री कार्यालय आणि विविध संपादकांनाही पाठवण्यात आले आहे.
नागरिकांचा आग्रह,रस्त्याचे रेस्टोरेशन तातडीने सुरू करा-
सध्या रस्त्यावर खड्डे, विस्कळीत भाग आणि उंचसखल पॅच मोठ्या प्रमाणात असल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. अपघाताचा धोका वाढला असून, रोजच्या प्रवासात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
निवेदनात परिसरातील लोकांनी महापालिकेला स्पष्टपणे आवाहन केले आहे की,तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करून रस्ता पूर्ववत करण्यात यावा.









