Published On : Tue, Nov 16th, 2021

मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे – प्राजक्ता लवंगारे-वर्मा

Advertisement

· राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक

·मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

नागपूर : भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवमतदारांची नोंदणी करण्यासह मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज येथे केले.

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयात श्रीमती लवंगारे-वर्मा यांच्या उपस्थितीत राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक झाली. जिल्हाधिकारी विमला आर, उपायुक्त आशा पठाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, तहसीलदार राहुल सारंग यांच्यासह लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य यांचे प्रतिनिधी व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, मयत व दुबार मतदारांची नावे वगळणे, स्थानांतर करणे, नावात दुरुस्ती करण्याची संधी पुनरीक्षण कार्यक्रमामुळे प्राप्त झाली आहे. प्रशासनामार्फत याविषयी व्यापक जनजागृती केली जात आहेच. राजकीय पक्षांनी सुद्धा मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नेमणूक करून, तसेच आपले स्तरावरून पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवून सहकार्य करावे. मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासह नावातील दुरुस्ती, नाव वगळण्याचा अर्ज ऑफलाईन अथवा ऑनलाईन पद्धतीने करता येणार असून याबाबत काही अडचणी असल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी सांगितले.

महाविद्यालय, विद्यापीठातील युवकांच्या मतदार नोंदणीसाठी ‘कॅम्पस ॲम्बेसेडर’ यांच्यामाध्यमातून प्रयत्न करावेत. प्रसारमाध्यमे, समाज माध्यमांच्या माध्यमातून युवकांपर्यंत याविषयी माहिती पोहचवावी. संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातील विशेष मोहिमेदरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांना भेटी देवून कार्यवाहीचा आढावा घ्यावा, असे श्रीमती लवंगारे-वर्मा म्हणाल्या. ‘व्होटर हेल्पलाईन’ (Voter Helpline App) या मोबाईल ॲपद्वारे अथवा ‘राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल’ (nvsp.in) द्वारे नाव नोंदणी, नाव वगळणे, मजकुरातील दुरुस्ती करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध असून याविषयी जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मतदार यादीमध्ये छायाचित्रे नसलेल्या एक लाख 42 हजार मतदारांची नावे यापूर्वी वगळण्यात आली आहेत. यादीमध्ये नाव असलेल्या व्यक्तीलाच आगामी निवडणुकांमध्ये मतदान करता येईल. त्यामुळे आपले नाव मतदार यादीमध्ये असल्याची खात्री करावी, 18 वर्षांवरील ज्या व्यक्तींनी अद्याप मतदार यादीत नाव नोंदविलेले नाही, त्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत आपले नाव ऑफलाईन अथवा ऑनलाईन स्वरुपात नोंदवावे. काही अडचणी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 9423317295 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी विमला आर. यांनी यावेळी सांगितले.