नागपूर (कलमेश्वर): कलमेश्वर परिसरातील आर. बी. फार्म हाऊसच्या जलतरण तलावाजवळ सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत दारूच्या नशेत धुंद असलेल्या १० तरुणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गांजासदृश पदार्थ, विदेशी दारूच्या चार बाटल्या, रोलिंग पेपर व प्लास्टिकच्या पुड्या जप्त केल्या.
कलमेश्वर पोलिसांना फार्म हाऊसमध्ये मोठ्या आवाजात संगीत व संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून सगळ्या प्रकाराचा पर्दाफाश केला.
अटकेत आलेल्या व्यक्तींमध्ये फार्म हाऊस व्यवस्थापक एंजेल रामरतन बैसवारे याच्यासह खालील तरुणांचा समावेश आहे:
कुणाल चंद्रमणि मेश्राम
पराग विजय शेंडे
सुजल लक्ष्मीकांत केहले
आर्यन प्रवीण नहाटे
आयुष कमलाकर कांबळे
आदित्य रामेश्वर मेश्राम
शानू प्रदीप लोखंडे
सर्वेश राजेंद्र मेश्राम
रोहित अरविंद पाटील
सर्व आरोपी हे नागपूर शहरातील विविध भागांतील रहिवासी असून त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा, अबकारी कायदा व महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फार्म हाऊस व्यवस्थापक बैसवारे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.