Published On : Tue, Mar 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

बजाज नगरमध्ये हुक्का कॅफेवर पोलिसांचा छापा; २९,७०० रुपयांचा तंबाखू व हुक्का साहित्य जप्त!

Advertisement

नागपूर : शहरातील बजाज नगर चौक परिसरातील एका कॅफेमध्ये हुक्का सेवा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बजाज नगर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत हुक्का पॉट, पाईप्स आणि फ्लेवर्ड तंबाखूसह एकूण २९ हजार ७०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मार्च रोजी रात्री सुमारे ११.५५ वाजता गस्तीदरम्यान पोलिसांना बजाज नगर चौकातील ‘सेलेस्टियर कॅफे’ येथे ग्राहकांना हुक्का दिला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर उपनिरीक्षक दीपक पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंच साक्षीदारांसह सुमारे १२.१५ वाजता कॅफेवर छापा टाकला.

Gold Rate
Mar 10, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,61,800/-
Gold 22 KT ₹ 1,50,500 /-
Silver/Kg ₹ 2,76,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

छाप्यावेळी कॅफेमध्ये तंबाखूचा तीव्र वास येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. सुमारे ३० बाय ५० फूट क्षेत्रफळाच्या कॅफेमध्ये सहा टेबल लावलेले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले ग्राहक सचिन अशोक भांडे (२७, रामनगर-तेलंगखेडी) आणि आदित्य अनिल पेंडके (३०, रेशीमबाग रोड) अशी ओळख पटली.

कॅफे व्यवस्थापक अभय प्रमोद राव (३४) याने पोलिसांना सांगितले की, कॅफेचे मालक अमित भीमदेव इंगोले (३५, जय दुर्गानगर, झिंगाबाई टाकळी) यांच्या सांगण्यावरून ग्राहकांना हुक्का व फ्लेवर्ड तंबाखू दिली जात होती.

कारवाईदरम्यान पोलिसांनी १३ काचेचे हुक्का पॉट, १३ स्टील पाईप, १३ रबर होज, १५ मातीचे चिलम तसेच डबल अॅपल, स्ट्रॉबेरी, सुल्तानी पान, ऑरेंज, ब्लूबेरी, ब्रेन फिझा आणि मिंट फ्लेवर्सचे तंबाखू पॅकेट्स जप्त केले. तंबाखूचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून उर्वरित साहित्य पंचांसमक्ष जप्त करण्यात आले.

या प्रकरणी व्यवस्थापक व मालकाविरोधात सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम (COTPA) 2003 तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सी. बी. चौहान यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून, शहराचे उपायुक्त एस. ऋषिकेश रेड्डी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुरव यांच्या देखरेखीखाली ही मोहीम राबविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement