Published On : Fri, May 8th, 2020

पोलिसांनो, कठोर व्हा अन्‌ नागरिकांनो, सहकार्य करा!

Advertisement

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन आणि इशाराही : पोलिस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक

नागपूर: कोव्हिड-१९ च्या दृष्टीने नागपूर शहरासाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या १५ दिवसांवर आपले नियंत्रण राहिले नाही तर पुढील १५ महिने असेच राहावे लागेल. त्यामुळे पोलिसांनो, प्रतिबंधित क्षेत्रामधील कुठलाही व्यक्ती बाहेर येणार नाही, असा बंदोबस्त करा आणि नागरिकांनो, तुम्ही सहकार्य करा असे आवाहन करतानाच जर नागरिकांनी ऐकले नाही तर कठोर पावले उचलावे लागतील आणि अधिकाऱ्यांनी कुचराई केली तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा कडक इशाराही नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

गेल्या दोन दिवसांत नागपूर शहरात एका विशिष्ट भागात मागील दोन दिवसांत वाढलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित क्षेत्रात पोलिस बंदोबस्त आणि निर्बंध अधिक कडक करण्यासंदर्भात नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम, अपर पोलिस आयुक्त शशीकांत महावरकर, पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे, धंतोली झोनच्या सहायक आयुक्त किरण बगडे, नेहरूनगर झोन सहायक आयुक्त स्नेहा करपे उपस्थित होते.

या बैठकीत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. सतरंजीपुऱ्यात रुग्ण आढळल्यानंतर तेथील क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. तेथील निर्बंध कडक केले. संपर्कात आलेल्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. यामुळे आज तेथील परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र मागील दोन दिवसांतील रुग्णसंख्येने शतक पार केले. यातील बहुतांश रुग्ण मोमीनपुरा परिसरातील आहे. हे क्षेत्र प्रतिबंधित घोषित केले असले तरी येथून आवागमन काही प्रमाणात सुरू असल्याचे लक्षात आले. काल-परवा या क्षेत्राव्यतिरिक्त आढळलेला एक रुग्ण हा मोमीनपुरा क्षेत्रात जाणे-येणे करीत असल्याचे समोर आले. ही बाब अत्यंत गंभीर आहे. असेच जर अन्य नागरिकही करीत असेल तर हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. मनपा अधिकारी आणि पोलिसांत समन्वय असायलाच हवा. या समन्वयातून यापुढे केवळ एक प्रवेश वगळता संपूर्ण क्षेत्र सील करा, असे कडक निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.

तक्रार असेल तर येथे करा….!
क्षेत्र प्रतिबंधित असले आणि कुणी काही तक्रारीचे कारण घेऊन बाहेर जाण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांना नागपूर महानगरपालिकेचे ‘नागपूर लाईव्ह सिटी ॲप’ डाऊनलोड करण्यास सांगा. अन्य काही अडचण असेल तर मनपाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती द्यायला सांगा, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

तर सरळ विलगीकरण कक्षात करा रवानगी
नागपूर महानगरपालिकेने जे क्षेत्र प्रतिबंधित केले आहे, त्या क्षेत्राच्या बाहेर कुणीही यायला नको किंवा बाहेरचा व्यक्ती आत जायला नको. तो मग कुणीही असो. कुठल्याही पदावर असो. जर तो पोलिसांशी हुज्जत घालत असेल तर त्याची रवानगी सरळ विलगीकरण कक्षात करा, असेही स्पष्ट निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.

मोमीनपुऱ्यात केवळ १० ते ४ अत्यावश्यक वस्तूंची दुकाने राहणार उघडी
मोमीनपुरात शनिवार ९ मे पासून अत्यावश्यक वस्तूंची दुकाने केवळी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंतच सुरू राहतील. तसे आदेश मनपा आयुक्तांतर्फे निर्गमित केले आहेत.. दुपारी ४ नंतर कुणीही रस्त्यावर दिसणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यायची आहे. तेथील लोकांच्या आरोग्यासाठीच हे कडक निर्णय घेण्यात येत असून नागरिकांनी त्यासाठी मनपा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

नागरिकांना भावनिक आवाहन आणि इशाराही
अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला नागरिकांनी मारहाण केल्याचे प्रकरण आज घडले, जे अत्यंत वाईट आहे. स्वत: बिनधास्त बाहेर फिरणाऱ्या नागरिकांनी अत्यावश्यक सेवेतील व्यक्तीला मारहाण करणे दुर्देवी आहे. अशा प्रवृत्तींची गय न करता सरळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. ह्या दिवसांत नियंत्रण ठेवले नाही, तर अत्यंत वाईट परिस्थिती उद्‌भवेल. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊन संपलेला नसल्यामुळ घरातच राहावे आणि नागपूर शहरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित करावे, असे भावनिक आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. जर नागरिकांनी आताही ऐकले नाही तर संपूर्ण शहरात संचारबंदी करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.