Published On : Tue, Jul 10th, 2018

शहराच्या विकासासाठी भाजपाचीच निवड करा : पालकमंत्री

नागपूर: नगर पंचायतींमुळे शहरांचा विकास शक्य झाला आहे. राज्यातील देवेंद्र फडणवीस शासनाने 10 हजार लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना नगर पंचायत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पारशिवनीला नगर पंचायत मिळाली आहे. नगर पंचायतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष हाच शहराचा विकास करणारा पक्ष असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

पारशिवनी नगर पंचायत निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचारसभेत पालकमंत्री बोलत होते. पारशिवनीत आज दोन प्रचारसभांना त्यांनी संबोधित करून कमळाला मते देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी व्यासपीठावर आ. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा भाजपाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, कमलाकर मेंघर, अध्यक्षपदाच्या उमेदवार माधुरी बावनकुळे, संजय टेकाडे, प्रकाश वांढे, अविनाश खळतकर, जयराम येरपुडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- कमळाच्या मागे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत. त्यामुळे या शहराचा विकास होणारच हे निश्चित आहे. या निवडणुकीत जी आश्वासने पक्षाने जनतेला दिली ती पूर्ण करण्याची जबाबदारी नगर पंचायत अध्यक्षाची राहणार आहे.

मी पालकमंत्री झाल्यानंतर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी असलेला तुटपुंजा निधी पाहता मी मुख्यमंत्र्यांकडे जिल्हा नियोजन समितीसाठी अधिक निधीची मागणी केली. आणि मुख्यमंत्र्यांनी ती पूर्ण करीत आज 200 कोटींवरून 651 कोटींचा निधी खर्च करण्याचे अधिकार आपल्याला दिले असल्याचे पालकमंत्री बावनकुळे म्हणाले. हा सर्व निधी जिल्ह्यातील जनतेला नागरी सुविधा आणि विकास कामांसाठ़ी वापरला जात आहे. या निधीतूनच पारशिवनी शहराच्या विकासासाठ़ी आवश्यक तेवढा निधी आपण देणार असल्याचेही ते म्हणाले.

याप्रसंगी पालकमंत्री बावनकुळे यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगत जनतेसाठी या योजना आहेत, असे सांगून जनतेने या योजनांचा लाभ घ्यावा. कर्जमाफीचा लाभ शेवटच्या माणसाला मिळेपर्यंत ही योजना सुरु राहणार असून सोबतच कर्जवाटपही करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

आ. मल्लिकार्जुन रेड्डी व कमलाकर मेंघर यांचीही यावेळी भाषणे झालीत. जुन्या बस स्टँडवर झालेल्या या सभेला मोठ़्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.