नागपूर: सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात मालमत्ता कर आकारणीसंदर्भातील नियोजन काही अंशी चुकले असेलही. तरीही अधिकारी आणि कर संकलन कर्मचाऱ्यांनी उत्तम कामगिरी केली. चालू आर्थिक वर्षात सुमारे ५०० कोटींचे कर संकलनाचे उद्दिष्ट गाठायला हवे, यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा यांनी केले.
नव्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पामध्ये नगरसेवकांकडून प्राप्त झालेले प्रस्ताव, कार्यालयीन दृष्टीकोनातून आवश्यक असलेली प्रस्तावित कामांची रीतसर पदनिहाय माहिती तसेच सन २०१७-१८ मधील आवश्यक अपूर्ण कामांच्या संबंधाने तसेच मनपाचे उत्पन्न वाढविण्याबाबत स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा यांनी झोननिहाय आढावा घेतला. बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, स्थायी समिती सदस्य मनोज सांगोळे, जुल्फेकार अहमद भुट्टो, मंगला खेकरे,सुनील हिरणवार, महेश महाजन, शेषराव गोतमारे, सोनाली कडू, हर्षला साबळे, नागेश मानकर, कल्पना कुंभलकर, अर्चना पाठक, विद्या कन्हेरे, अभिरुची राजगिरे, मंगला लांजेवार, उपायुक्त रवींद्र देवतळे उपस्थित होते.
स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा म्हणाले, मागील वर्षी मालमत्ता कर निर्धारण, डिमांड पोहचविणे आदी सर्व कामे नियोजनानुसार झाली नाहीत. यावेळी ज्या मालमत्तांचे कर निर्धारण झाले नाही, ते तातडीने करण्यात यावे. त्यावर नियमानुसार जो कर आकारण्यात येईल, तीच वसुली करावयाची आहे. नागरिक कर भरण्यास तयार आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून आवश्यक ती पावले पूर्वीपासूनच उचलायला हवी. यासाठी झोन सहायक आयुक्तांनी पुढील सात दिवसांत झोनस्तरावर बैठक घेऊन नियोजन तयार करण्याचे निर्देश दिले. त्यावर चर्चा करण्याकरिता सर्व झोनकडून नियोजन प्राप्त झाल्यावर लवकरच मुख्यालयात बैठक घेण्यात येईल, असेही श्री. कुकरेजा यांनी सांगितले.
झोननिहाय आढाव्यादरम्यान झोनच्या सहायक आयुक्तांनी सन २०१७-१८ मधील आवश्यक अपूर्ण कामांची माहिती आणि सन २०१८-१९ मध्ये आवश्यक प्रस्तावित कामांसाठी किती तरतूद हवी, याबाबत माहिती दिली. यावर बैठकीत चर्चाही झाली.
बैठकीला सर्व झोनचे सहायक आयुक्त व संबंधित अधिकारी उपस्थित होते.