Published On : Thu, Oct 4th, 2018

खुशखबर…महाराष्ट्रात पेट्रोलच्या किमतीत 5 रुपयांची कपात

मुंबई : इंधनाच्या दरामध्ये केंद्र सरकराने नुकतेच 2.5 रुपये कमी केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकरानेही केवळ पेट्रोलमध्ये 2.5 रुपयांची कपात करण्याचे ठरविले आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर शिक्कामोर्तब केले. तर डिझेलचे भाव ‘जैसे थे’च राहणार आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकतीच 2.5 रुपयांनी इंधनाचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. तसेच राज्य सरकारांनाही आणखी 2.5 रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचे आवाहन केले होते. यानुसार महाराष्ट्र सरकारने लगेचच 2.5 रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, डिझेलचे दर जैसे थेच ठेवण्यात आले आहेत. लोकमतला सुत्रांनी ही माहिती दिली.
पेट्रोल-डिझेल 2.5 रुपयांनी स्वस्त करणार; जेटलींची घोषणा

आज मुंबईमध्ये पेट्रोल 91.34 रुपये तर डिझेल 80.10 रुपयांना विकले जात आहे. नवे दर मध्यरात्रीपासून लागू होणार असून नव्या दराप्रमाणे पेट्रोल 86.34 आणि डिझेलचा दर 77.60 रुपयांना मिळेल.

डिझेलचे दर का कमी झाले नाहीत?

देशात डिझेलच्या दरांच्या तुलनेत महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आहे. आधीच महाराष्ट्रात डिझेलचे दर कमी असल्याने ते कमी केले नसल्याचा खुलासा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.