Published On : Fri, Aug 18th, 2017

जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेतीला शाश्वत सिंचनाचा लाभ – प्रा. राम शिंदे

 
  • आंजनगाव शिवारातील जलसाठ्याचे पूजन
  • सिंमेट बंधाऱ्यामुळे पिकांना जीवनदान
  • नाला खोलीकरणानंतर जलसाठ्यात वाढ


नागपूर: टंचाईमुक्त राज्याची संकल्पना साकार करताना शिवारात पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाचे कामे मोठ्या प्रमाणात घेतल्यामुळे कमी पर्जन्यमानानंतरही शेतकऱ्यांना शेतातील पिकांचे संवर्धन करण्यासाठी पाणी उपलब्ध होत आहे. जलयुक्त शिवार हा महत्वकांक्षी कार्यक्रम ग्रामीण भागात समृध्दी आणण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांमध्ये जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

हिंगणा तालुक्यातील आंजनगाव येथील सिंमेट नाला बंधाऱ्याच्या खोलीकरणाअंतर्गत उपलब्ध झालेल्या जलसाठ्याचे विधीवत जलपूजन प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी शेतकरी व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार समीर मेघे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती रत्नमालाताई इरपाते, सुधाकर ढोणे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष ब्बलू गौतम, उपसरपंच अर्चना मरसकोल्हे, विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता बाणू बाकडे, पंचायत समितीचे उपसभापती श्री. अवचट उपस्थित होते.

जलयुक्त शिवार अभियानामध्ये हिंगणा परिसरातील 58 गावांची निवड करण्यात आली असून विविध यंत्रणांनी नाला खोलीकरण, सिंमेट बांध बंधारे, तलावाचे बांधकाम आदी कामे मोठ्या प्रमाणात झाले असून शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी जलसाठे निर्माण झाले आहे. तसेच भूगर्भातील जलसाठ्यात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करुन वापर करावा, असे आवाहन प्रा. राम शिंदे यांनी यावेळी केले.


टँकरमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना जलयुक्त अभियानामुळे यशस्वी झाली असून मागील वर्षी चार हजार टँकर कमी झाले आहेत. कमी पावसामुळे उध्दभवलेल्या परिस्थितीत पिकांना पाणी देण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वेणा नदीच्या खोलीकरणासाठी 18 कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला असून यावर्षी 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नदी पुनर्जीवनाच्या कामासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी गवाही जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.

आमदार समीर मेघे यांनी आंजनगाव येथील शिवारात बांधण्यात आलेल्या सिंमेट नाला बांध गाळामुळे पाणी साठवणूक क्षमता संपलेली होती. येथील नाला खोलीकरणामुळे 11.72 टीसीएम पाणी उपलब्ध झाले आहेत. त्यासोबत भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे शेतातील विहिरींच्या पातळीत वाढ झाली आहे.

हिंगणा तालुक्याची जीवनदायनी असलेल्या वेणा नदीचे खोलीकरण व पुनर्जीवन आवश्यक असून यासाठी 18 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी यावेळी केली.

प्रारंभी तालुका कृषी अधिकारी संजय भगत यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात हिंगणा तालुक्यात यावर्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 18 गावाची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी 1 कोटी 45 लाख रुपयाचे प्रस्ताव आहेत. आंजनगाव येथे कृषी विभागाच्या तीन जुन्या सिंमेट नाला बांधाचे खोलीकरण करण्यात आले असून त्यामुळे 35.95 टीएमसी पाणी उपलब्ध झाल्याची माहिती दिली.

यावेळी जलसंधारणासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कृषी सहायकाचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई खोबे, विजयभाऊ गुरमुले, श्रावण गुरमुले, आनंदराव जुनघरे, अविनाश उमरे, तसेच शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.