नागपूर : वाडी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने अवघ्या ४८ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईतून पोलिसांनी सुमारे ₹६२,८४८ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
माहितीनुसार, फिर्यादी भिकु नामदेवराव तन्हानकर (५५, रा. दवलामेटी, नागपूर) हे २० ऑगस्ट रोजी महाप्रज्ञा बौद्ध विहार, धम्मकिर्ती नगर येथे मुक्कामी होते. २२ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता ते घरी परतले असता हॉलचा दरवाजा उघडा व तुटलेला दिसला. आत जाऊन पाहिले असता बेडरूममधील आलमारी तोडून सोन्याचे दागिने, नगदी आणि नाण्यांचा डबा असा सुमारे ₹६८,५०० किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याचे स्पष्ट झाले. तक्रारीवरून वाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
तपास पथकाची धडाकेबाज कारवाई-
घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच गुप्त माहितीदारांमार्फत माहिती मिळवून पोलिसांनी संशयित करण उर्फ क्रिश राजकुमार पाल (१९, रा. म्हाडा कॉलनी, वाडी) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, चांदीची अंगठी, परदेशी चलन तसेच नगदी मिळून ₹६२,८४८ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाईत सहभागी अधिकारी-
ही कारवाई पोलीस उपायुक्त ऋषीकेश रेड्डी व सपोआ सतिश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, पो.उपनिरीक्षक अमित बंडगर तसेच इतर सहा कर्मचाऱ्यांनी केली.
या कारवाईमुळे वाडी परिसरातील घरफोडीच्या मालिकेला आळा बसला असून स्थानिक रहिवाशांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. पुढील तपास पो. उपनिरीक्षक अमित बंडगर करीत आहेत.