Published On : Sat, Oct 7th, 2017

संकट काळात जनतेने ऊर्जा बचत करावी

नागपूर: कमी वीज निर्मितीमुळे राज्यावर निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत जनतेने ऊर्जा बचत करून शासनाला सहकार्य करावे व भारनियमनाच्या संकटातून राज्याला बाहेर काढण्यास मदत करावी असे नम्र आवाहन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जनतेला केले आहे.

ऊर्जा बचतीचे आवाहन करताना बावनकुळे म्हणाले की, तात्पुरत्या संकटाच्या काळात ऊर्जा बचत करणे हाच तूर्तास उपाय आहे. गरज नसताना विजेचा वापर टाळावा. घरात सर्व ठिकाणी एलईडी बल्ब/ट्यूबलाईटचा वापर करावा. आवश्यकता नसेल तर पंखे सुरु करू नयेत. गरज असेल तेव्हाच एअर कंडीशनचा उपयोग करावा. संकटाच्या काळात एसीचा वापर टाळल्यास बरे होईल. टीव्ही, पंखे सतत सुरु ठेवू नयेत. ज्या भागात भारनियमन नाही अशा भागातील नागरिकांनी वीज सुरु असतानाही किमान दोन तास वीज वापर स्वत:हूनच बंद ठेवावा. अशा उपाययोजना केल्या तर वीजबचत होईल व ज्या भागांना वीज मिळत नाही, अशा भागांना वीजपुरवठा करून त्या नागरिकांनाही भारनियमनाच्या संकटापासून दिलासा देणे शक्य होईल, असेही ऊर्जामंत्र्यांनी म्हटले.

महानगर पालिका, नगर परिषदा, ग्रामपंचायतींनी पथदिवे तासभर उशीरा सुरु करून पहाटे 5 वाजता बंद करावेत. अनेक ठिकाणी दिवसभर पथदिवे सुरु असतात. विजेचा असा अपव्यय टाळावा. शासकीय व खाजगी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी दिवसाच्या वेळी लाईटचा वापर करू नये. अत्यंत आवश्यक असेल तेथे दिवसा लाईट वापरावे. कार्यालयाच्या बाहेर जाताना लाईट- पंखे सुरु राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी. आठवणीने लाईट पंखे बंद करावीत. या उपाययोजनांतून वीजबचत करून संकटाच्या काळात सरकारला सहकार्य करावे, असेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहे.