Published On : Tue, Nov 5th, 2019

मनपाच्या नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आता बालरोग आणि स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी

एम्स आणि टाटा ट्रस्टचा पुढाकार : मंगळवार आणि शुक्रवारी विशेष ओपीडी

नागपूर : नागपूर महानगरपालिका, टाटा ट्रस्ट आणि एम्समध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार आता नागपूरच्या विविध नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासाठी विशेष ओपीडीची सुरुवात करण्यात येत आहे. या सेवेचा शुभारंभ एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या नंदनवन येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी (ता. ५) झाला.

नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येणारी आरोग्य सेवा गरीबांना तसेच मध्यमवर्गीयांना परवडेल या दृष्टिकोनातून अधिक सक्षम बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच हेतूने टाटा ट्रस्टने पुढाकार घेत नागपूर महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या २७ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे नविनीकरण व आधुनिकीकरण करून अधिक चांगल्या सेवा देण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. सोबतच एम्स या संस्थेनेही ही सेवा अधिक सक्षम करण्यासाठी संस्थेचे विशेषज्ञ ठराविक दिवशी अशा नागरी आरोग्य केंद्रात जाऊन रुग्णांची पाहणी व मार्गदर्शन करतील, यासाठी पुढाकार घेतला. मनपा, टाटा ट्रस्ट आणि एम्समध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार आता तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळण्याची सुरुवात मंगळवार ५ नोव्हेंबरपासून नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली.

ह्या नाविन्यपूर्ण कार्याची सुरुवात एम्सचे डॉ. प्रदीप देशमुख, डॉ. मीनाक्षी गिरीश, डॉ. सुचिता मुंडले, डॉ. अभिजित चौधरी, मनपाचे आयुक्त श्री अभिजित बांगर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. सरीता कामदार, टाटा ट्रस्ट चे प्रकल्प प्रमुख अमर नवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नागपूर शहरातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे आणि गरीब व मध्यमवर्गीयांना परवडेल या दृष्टिकोनातून सेवा पुरविण्याचा संकल्प मनपा, टाटा ट्रस्टने केला आहे. त्यांच्या सोबतीला आता एम्ससारखी संस्था आल्याने नागरिकांना अधिकाधिक सोयी देता येईल, असे सांगत या सोयींचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.

दोन दिवस विशेष ओपीडी

विशेष सोयीचा शुभारंभ नंदनवन येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातून झाला. नंदनवन येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी बालरोग तज्ज्ञ आणि शुक्रवारी स्त्री रोग तज्ज्ञांची ओपीडी सकाळी ९ ते १ या वेळेत राहील असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सरीता कामदार यांनी दिली.