Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Aug 10th, 2020

  रेखा गायधने याना दिलेले देयक वीज वापरानुसारच

  लीलाधर गायधने यांच्या मृत्यूला महावितरण जबाबदार नाही

  नागपूर: उत्तर नागपुरातील पाहुणे ले आऊट येथील वीज ग्राहक रेखा लीलाधर गायधने यांना महावितरणकडून देण्यात आलेले देयक योग्य वीज वापराचे असून मागील वर्षाचे वीज बिल न भरल्याने त्यांच्या वीज बिलाची थकबाकी अधिक दिसून येते. तसेच वीज बिल दुरुस्ती साठी महावितरण ने मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या आहे व ग्राहकांना हप्तेही पाडून देण्यात येत आहे व कुणाचाही वीज पुरवठा खंडित करण्यात येत नाही ही सर्व वस्तुस्थिती असल्यामुळे लीलाधर गायधने यांच्या मृत्यूशी महावितरणचा संबंध नाही असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.

  महावितरणने दिलेल्या माहितीनुसार,महावितरणच्या लष्करीबाग उपविभागा अंर्तगत पाहुणे ले आऊट येथील रेखा गायधने यांच्या नावे वीज जोडणी आहे. सदर ग्राहकाला माहे जून २०२० मध्ये प्रत्यक्ष मिटर वाचनानुसार माहे फेब्रुवारी २०२०, मार्च २०२०, एप्रिल २०२०, मे २०२० आणि जून २०२० अशी ५ महिन्याची एकत्रित १ हजार ५१५ युनिट वापराचे १३ हजार २९४ रुपयांचे वीज बिल देण्यात आले. या वीज ग्राहकाकडे जून २०१९ ते जानेवारी २०२० अशी आठ महिन्यांची मागील थकबाकी रुपये २३ हजार ७४६ होती.या वर्षीची वीज बिलाची थकबाकी आणि मागील वर्षाची थकबाकी मिळून एकूण ३७ हजार ०४० रुपयाचे देयक देण्यात आले.माहे जुलै २०२० च्या देयकानुसार ३०८ युनिट वीज वापर हा देखील प्रत्यक्ष मीटर वाचनानुसार असून देयकाची रक्कम २,९६९ रुपये आहे व मागील थकबाकी ३७,०४० रुपयासहित देयक ४० हजार ०१० रुपयांचे आहे. सदर ग्राहकाचे जुने मिटरचे इनकमीग जळालेले असल्याने ग्राहकाच्या विनंतीनुसार फेब्रुवारी- २०२० मध्ये मिटर बदलविण्यात आले होते. यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज ग्राहकाची बाजू ऐकली नाही, हे म्हणणे चुकीचे आहे.

  ग्राहकाचा मागील दोन वर्षाचा फेब्रुवारी ते जून या महिन्यांचा मिटर वाचनानुसार सरासरी वीज वापर खालील प्रमाणे फेब्रुवारी २० ते जून २०= १५१५ युनिट फेब्रुवारी- १९ ते जून- १९= २११९ युनिट्स फेब्रुवारी- १८ ते जून १८ = २५२९ युनिट्स होता. या वरून दिसून येईल की, ग्राहकाचा २०१८, २०१९ या मागील दोन वर्षाच्या तुलनेत विजेचा वापर सन २०२० च्या तुलनेत अधिक होता आणि त्या सर्व देयकांचा नियमित भरणा ग्राहकाने वेळोवेळी केलेला आहे.ग्राहकाला देण्यात आलेले जून २०२० व जुलै २०२० चे वीज देयक हे प्रत्यक्ष मिटर वाचनानुसार असून त्यात कुठलाही अतिरिक्त अधिभार लावण्यात आलेला नाही.सदर ग्राहकाला वीज देयकाध्ये स्लॅब बेनीफीटचा लाभ मिळालेला आहे.

  रेखा लीलाधर गायधने यांनी मागील ११ महिन्याच्या कालावधीत केवळ २ वेळा महावितरणच्या देयकाचे पैसे पूर्ण न भरता अंशतः भरले होते. मार्च- २०२० पासून त्यांनी देयकांचे पैसे भरले नाहीत.माहे मे २०१९ पर्यंतच्या देयकांचा नियमित भरणा ग्राहकाने केलेला आहे परंतु जून २०१९ पासून अनियमितता असून थकबाकी संचित होऊन ग्राहकाच्या देयकाची रक्कम फुगलेली दिसत असल्याचे आढळून आले. लॉकडाउन नंतर आलेल्या एकत्रित वीज देयकाची ग्राहकांना ऑनलाईन माहिती देण्यासाठी billcal.mahadiscom.in/consumerbill लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच उपविभागात आलेल्या ग्राहकांकरिता देखील हेल्पडेस्कच्या माध्यमातून वीज देयकांच्या तक्रारीचे निरसन करण्यात येवून माहिती देण्यात येत आहे.एकत्रित आलेली वीज देयके भरणे ग्राहकांना आर्थिक दृष्ट्या सोयीचे व्हावे म्हणून समान मासिक तीन हफ्त्यात वीज देयक भरण्याची देखील सोय देण्यात आलेली आहे.लॉकडाउनच्या कालावधीमध्ये तसेच लॉकडाउन नंतर वीज देयकाचा भरणा करू न शकलेल्या कुठल्याही थकबाकीदार ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला नाही किंवा तशा सूचना देखील दिलेल्या नाहीत. यामुळे महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यासाठी दबाव होता हे म्हणणे देखील पूर्णपणे चुकीचे आहे.त्यामुळे लीलाधर गायधने यांच्या मृत्यूला महावितरण जबाबदार नाही असे महावितरणने स्पष्ट केले आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145