Published On : Thu, Aug 8th, 2019

पवनी येथे लवकरच महावितरण चे कार्यालय सुरू करणार- पालकमंत्री

Advertisement

नागपूर: रामटेक तालुक्यातील पवनी येथे आजूबाजूच्या परिसरातील 35 गावांसाठी लवकरच महावितरण चे कार्यालय सुरू करणार असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज देवलापार येथे केले. नागरिकांच्या सोयीसाठी वळंबा या गावी 33 केव्ही क्षमतेची विद्युत वाहिनीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

देवलापार येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय यादव यांच्यासह स्थानिक स्वराज्यसंस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. सामान्य जनतेला महसुली सुविधेसाठी आधी रामटेक येथे जावे लागायचे. मात्र, देवलापार येथे अप्पर तहसीलदार कार्यालय झाल्याने नागरिकांना प्रमाणपत्र व दाखले मिळण्यासाठी सुलभता होईल, असे मत आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी व्यक्त केले.

पालकमंत्री आज रामटेक तालुक्याच्या दौऱ्यावर होते. पारशिवनी तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या अतिक्रमण धारकांना एकूण 49 पट्टे वाटप पालकमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले.प्रातिनिधिक स्वरूपात पट्टेवाटप करण्यात आले असून पट्टे वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी जे. पी.कटीयार यांनी सांगितले.

2022 पर्यत सर्वाना घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध असून विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री म्हणाले. वीज,पाणी, चांगले शिक्षण, आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून चांगले आरोग्य देण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करत आहेत.

पारशिवनी येथे चुलमुक्त धूरमुक्त महाराष्ट्र या योजनेतील लाभार्थ्याना पालकमंत्री यांच्या हस्ते दिनदयाल उपाध्याय विशेष अभियानांतर्गत गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. यापूर्वी पारशिवनीतालुक्यात 426 लोकांना कनेक्शन देण्यात आले तर आज 250 लार्भाथ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात गॅस कनेक्शन मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

देवलापार येथील उपबाजाराचा शुभारंभ देखील पालकमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रामटेक कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती अनिल कोल्हे व ग्रामस्थ उपस्थित होते.