
नागपूर : समाजसेवेच्या नावानं सुरू झालेलं राजकारण आता ठेका आणि टाळ्यांपुरतं उरलं आहे का, असा प्रश्न शहरात गाजतोय. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या नागपूर कार्यालयात दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाच्या वेळी “वाजले की बारा” या लावणीवर रंगलेल्या नृत्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
स्नेहमिलन की मनोरंजनाचा ठेका?
शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या स्नेहमिलनात लावणी सादर होताच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्साहात टाळ्या वाजवताना दिसले. मात्र, व्हिडिओ समोर आल्यानंतर नागपूरकरांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. “हे राजकारण आहे की कार्यक्रमांचं स्टेज शो?” असे प्रश्न विचारले जात आहेत.
महिला कार्यकर्त्यांचा रोष-
नुकत्याच या कार्यालयात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिलांना अन्यायाविरुद्ध लढण्याचं आवाहन केलं होतं. त्याच ठिकाणी पुरुषांसमोर लावणी सादर होणं — महिलांमध्ये नाराजीचं कारण ठरलं आहे. शिवसेना नेत्या मनीषा पापडकर यांनी टोला लगावत म्हटलं, “दिवाळीत अशी संस्कृती फुलवणं म्हणजे पक्षाचं नुकसानच आहे.”
सुनील तटकरे यांचा इशारा-
या घटनेनंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शहराध्यक्ष अहिरकर यांना सात दिवसांत खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत. अहिरकर यांनी “हा फक्त स्नेहमिलन कार्यक्रम होता, कोणताही व्यावसायिक शो नव्हता” अशी सफाई दिली असली, तरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. “अशा कृतींमुळे पक्षाचा विश्वास कमी होतो,” अशी चर्चा सुरू आहे.
शेतकऱ्यांच्या वेदना, नेत्यांचा ठेका-
राज्यात शेतकरी अतिवृष्टीने हवालदिल आहेत, आत्महत्या वाढल्या आहेत. मात्र सत्ताधारी नेते मात्र नाचगाण्यांमध्ये रमलेत, अशी टीका होत आहे. “बळीराजासाठी आवाज नाही, पण लावणीसाठी वेळ आहे!” अशी प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रतिमेवर घाव, निवडणुका डोळ्यासमोर-
विदर्भात राष्ट्रवादी (अजित गट)चं अस्तित्व आधीच कमकुवत आहे. त्यात या व्हायरल प्रकरणानं पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना अजित पवार गटासाठी “दिवाळीचा राजकीय धक्का” ठरत असल्याची चर्चा आहे.









