Published On : Tue, Jan 21st, 2020

मनपा प्राथमिक आरोग्य सेवेबाबत भागीदारांची कार्यशाळा २१ जानेवारीला

नागपूर : नागपूर महानगरपालिकेची प्राथमिक आरोग्य सेवा दर्जेदार व बळकट करण्याबाबत मंगळवारी २१ जानेवारीला टाटा ट्रस्टच्या वतीने रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे भागीदारांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

सकाळी ८.३० ते सायंकाळी ४.३० पर्यंत कार्यशाळा राहिल. सकाळी ९.३० वाजता महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होईल. याप्रसंगी मनपा आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी उपस्थित राहतील.

उद्घाटन सत्रामध्ये प्रीती पंत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाबाबत माहिती देतील. यानंतर मनपा आयुक्त अभिजीत बांगर मनपाच्या आरोग्य सुविधेची माहिती सादर करतील. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान प्रकल्पाच्या कार्याची टाटा ट्रस्टचे आरोग्य संचालक एचएसडी श्रीनिवास माहिती सादर करतील. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान प्रकल्पामधील एचएसटीपी ची भूमिका या विषयावर एचएसटी चे सीईओ राजीव सदानंदन माहिती देतील. पहिल्या सत्राचे आभार अतिरिक्त आयुक्त राम जोशी मानतील.

सकाळी १०.३० वाजता दुस-या सत्रामध्ये एचएसटीपी चे तांत्रिक सल्लागार डॉ.एन.देवदशन प्राथमिक आरोग्य सुविधेबाबत चर्चा करतील. पुढील सत्रात मनपाच्या आरोग्य उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे या नागपूर शहरातील आरोग्य सुविधेची सद्यस्थिती व टाटा ट्रस्टचे डॉ.अमर नवकर हे अत्याधुनिक शहरी प्राथमिक आरोग्य प्रकल्पाबाबत चर्चा करतील.

यानंतर पुढील सत्रांमध्ये शहरातील आरोग्य सुविधेसंबंधीच्या विविष विषयांवर खुली चर्चा करण्यात येईल. दुपारच्या समारोपीय सत्रामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे महाव्यवस्थापक व आरोग्य सुविधा आयुक्त डॉ.अनूप कुमार यादव, विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, मनपा आयुक्त अभिजीत बांगर उपस्थित राहतील.