Published On : Tue, Jun 5th, 2018

एम्प्रेस मॉलच्या पार्किंगमधील सज्जा पडला

Advertisement

नागपूर : विविध घटनांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या एम्प्रेस मॉलच्या पार्किंगमध्ये मंगळवारी सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. इमारतीच्या बाह्य भागातील एक सज्जा पार्किंगमधील कारवर पडला. यामुळे चार कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कारमधील मंडळी काही मिनिटांपूर्वीच तेथून निघून गेली होती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. विशेष म्हणजे, ही दुर्घटना झाल्यानंतर मॉल प्रशासनाने जबाबदारी स्वीकारण्याऐवजी आपला उर्मटपणा दाखवला.

मॉलमध्ये खरेदी तसेच अन्य दुसऱ्या निमित्ताने येणारी मंडळी एम्प्रेसच्या पार्किंगमध्ये आपापली वाहने लावतात. रोज येथे मोठ्या संख्येत वाहनधारक आपापली वाहने पार्क करतात. त्यासाठी मॉलतर्फे तीन तासांचे ३० रुपये पार्किं ग शुल्कही घेतले जाते. नेहमीप्रमाणे आज सायंकाळी येथे अनेक वाहनधारकांनी आपापली वाहने पार्क केली आणि कुणी खरेदीला तर कुणी सिनेमाला गेले. सायंकाळी ५.३० च्या सुमारास आलेल्या वादळ-वाऱ्यामुळे इमारतीच्या पार्किंगच्या बाह्य भागातील सज्जा खाली कोसळला. लांबलचक अन् जाडजूड सज्जामुळे खाली उभी असलेली विटारा ब्रिजा (एमएच ४९/ एएस २६२१) तसेच होंडा सिटी, फियाट लिनिया आणि आय-२० या चार कारचे मोठे नुकसान झाले.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विशाल अग्रवाल यांच्या मालकीच्या विटारा ब्रिजा कारची तर पुरती तुटफूट झाली. कारचे छत चपकले, मागचे-पुढचे काच, लाईट चकनाचूर झाले. अन्य कारांचीही अशीच अवस्था होती. विशेष म्हणजे, सज्जा कोसळण्याच्या काही मिनिटांपूर्वीच तेथून एक परिवार आपले वाहन लावून काही अंतरावर गेला अन् ही दुर्घटना घडली. सुदैवाने तेथे त्यावेळी कुणी नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, काम आटोपल्यानंतर कारमालक अग्रवाल पार्किंगमध्ये आले तेव्हा त्यांना त्यांच्या कारसह अन्य कारही तुटफूट झालेल्या दिसल्या. सज्ज्याचा मलबा सर्वत्र पसरला होता.

बेजबाबदारीचा कळस

अग्रवाल यांनी ही बाब एम्प्रेस मॉल प्रशासनाच्या लक्षात आणून दिली असता मॉल प्रशासनाने संतापजनक व्यवहार केला. बेजबाबदार वर्तन करीत तो सज्जा हवेमुळे पडला, त्याला कोण काय करू शकते, असा प्रश्न त्यांनी अग्रवाल यांना केला. हवेमुळे एवढा जाडजूड सज्जा पडू शकत नाही. तो निकृष्ट बांधकामामुळेच पडला, असे अग्रवाल यांनी मॉल प्रशासनाच्या लक्षात आणून दिले असता त्यांनी आम्ही काही करू शकत नाही, असे म्हणत निष्काळजीपणाचा परिचय दिल्याचा अग्रवाल यांचा आरोप आहे. प्रशासनाच्या या अक्षम्य हलगर्जीपणामुळे अग्रवाल आणि अन्य कारमालकांनी रात्री गणेशपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांकडे त्यांनी या प्रकरणाची तक्रार दिली. मात्र, वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता.

Advertisement
Advertisement