
नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी देशात अराजकता निर्माण करून संवैधानिक संस्थांबाबत जनतेच्या मनात संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजप नेते परिणय फुके यांनी केला. देशातील विविध आंदोलनांचा संदर्भ देत त्यांनी एलॉन मस्क यांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित केले. या आंदोलनांमागे मस्क यांचा पैसा असल्याचा आरोपही फुके यांनी केला. याशिवाय एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन, भाजपची संघटनात्मक कार्यपद्धती, काँग्रेस नेत्यांची सरन्यायाधीशांशी भेट आणि निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ पुढे आलेले प्रशासकीय अधिकारी यांवर त्यांनी भाष्य केले.
राहुल गांधी संविधानावरील जनतेचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न करत असून, देशात डावी कम्युनिस्ट विचारसरणी आणण्याचा त्यांचा हेतू असल्याचा दावाही फुके यांनी केला. राहुल गांधी चीन आणि जागतिक स्तरावरील मोठ्या उद्योजकांसाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, या आरोपांच्या समर्थनार्थ त्यांनी कोणतेही ठोस पुरावे सादर केल्याची माहिती उपलब्ध नाही.
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलताना फुके म्हणाले की, राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले आणि विद्यार्थ्यांनीही योग्य निर्णय घेतल्याने आंदोलन संपले. विद्यार्थ्यांचा १५ ते २० दिवसांचा अभ्यासाचा वेळ वाया गेल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याशी तडजोड न करण्याचे आवाहन केले.
भाजपच्या संघटनात्मक कार्यपद्धतीबाबत बोलताना जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखून नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाचे काम केले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच काँग्रेस नेत्यांच्या सरन्यायाधीशांशी भेटीवर टीका करत लोकशाही वाचवण्याच्या नावाखाली काँग्रेसकडून राजकीय दिखावा केला जात असल्याचा आरोप केला.
निवडणूक प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नांना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढे येऊन उत्तर दिले आहे, असे फुके म्हणाले. निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका ही राहुल गांधी यांच्या आरोपांना चपराक असल्याचेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, अभिजीत दीपके प्रकरणात दिल्ली पोलिसांनी त्यांना जाण्याची मुभा दिली होती, तरीही ते गेले नाहीत, असा दावा फुके यांनी केला. आजीच्या निधनाच्या मुद्द्यावरून या प्रकरणाचे राजकारण केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.



