Published On : Fri, Jun 14th, 2019

माता-पित्याचे छत्र हरविलेल्या भावनाला ७७ टक्के गुण

Advertisement

भाचीच्या शिक्षणासाठी आत्याच झाली ‘माऊली’

नागपूर: भावना वर्षभराची असेल तेव्हा तिची आई कुणालाही न सांगता भावनाला वाऱ्यावर सोडून गेली ती कायमचीच! अद्यापही तिचा थांगपत्ता नाही. तेव्हापासून तिची आत्या लक्ष्मी लॉरेन्स हीच तिची माऊली झाली. पोटच्या लेकीप्रमाणे तिचा सांभाळ केला. हृदय विकाराचा झटका आल्याने भावनाचे वडिलही ३ महिन्यापूर्वी दगावले. परिस्थितीच्या एवढ्या वादळात खंबीरपणे उभे राहून भावनाने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत ७७ टक्के गुण मिळवून दुर्गा नगर शाळेतून दुसरा क्रमांक पटकावला आहे.

मानेवाडा भागात आत्या आणि भाची एका घरात राहतात. १०वीच्या वर्षाला असली तरी भावना पहाटे ४ वाजता उठून चुलीवर वडिलांचा डबा बनवायची. यानंतर अभ्यास करणे आणि शाळेला जाणे ही भावनाची नित्याची दिनचर्या होती. शाळेतून घरी आल्यावर ती ४ तास अभ्यासाला द्यायची. आत्या लक्ष्मीबाई आसपासच्या वस्त्यांमधील घरांमध्ये घरकाम करून भावनाच्या शिक्षणाचा खर्च उचलत आहे. भावना हीच तिचा आजचा आणि भविष्याचा आधार आहे. हलाखीच्या परिस्थितीतूनही भाची शाळेतून टॉपर आल्याचा आनंद गगणात मावत नाही. लक्ष्मीबाईचाही पती फार वर्षांपूर्वी वारला. पोटच्या मुलीचे कसेबसे लग्न करून दिले. भावनाला सोबत घेऊन ती आयुष्य जगत आहे. भावनाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिला वर्गशिक्षिका धारगे मॅडम, पांडे मॅडम, दरणे मॅडम आणि मुख्याध्यापक गोहोकर सरांनी धीर दिला.

केमिकल इंजिनीअर व्हायचे आहे. पण…
पॉलीटेक्निक करून भविष्यात केमिकल इंजिनीयर होण्याचा मानस भावनाने व्यक्त केला. मात्र, उच्च शिक्षणासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा या विचाराने दोघीही आत्या-भाच्या हवालदिल होतात. दुर्गा नगर मनपा शाळेतील शिक्षकांनी भावनाच्या शिक्षणाचा आजपर्यंतचा खर्च उचलला. मात्र, पुढील शिक्षणासाठी तिला बाहेर पडावेच लागेल. वाढत्या गरजा आणि पैशाचा ताळमेळ बसविणे भावनाला कठीणच जाणार आहे. सामाजिक बांधिलकी असलेल्या शहरातील एनजीओ आणि दानशूरांनी तिला मदत केली तर भावनाला इंजिनीअर होण्यास मदत मिळेल, असा विचार मुख्याध्यापक गोहोकर यांनी व्यक्त केला.