Published On : Thu, Oct 21st, 2021

पारडी ब्रिज दुर्घटना – केंद्रीय जांच कमेटी करणार चौकशी, गडकरींचे आदेश

कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेने घटिया राजकारण करू नये : आ.कृष्णा खोपडे

नागपूर : पारडी ब्रिजचा कळमना भागातील पुलाचा एक सेक्शन पडल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला खरा, मात्र सुदैवाने या ठिकाणी जीवित हानी झालेली नाही. मात्र तरीसुद्धा अधिका-यांच्या लापरवाहीने म्हणा किंवा कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे झालेली ही घटना निश्चितच दुर्दैवी आहे. मला या घटनेबाबत माहिती मिळाली त्यावेळी मी मुंबईला आधीच निघून गेलो होतो. मात्र मी लगेच एन.एच.ए.आय. च्या अधिका-यांची व कंत्राटदारासोबत घटनेची सविस्तर माहिती घेऊन केंद्रिय मंत्री नितीनजी गडकरी यांना संपूर्ण सविस्तर माहिती दिली. गडकरी साहेबांनी ताबडतोब केंद्रीय जांच समितीला या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे कोणत्याही दोषी अधिकारी व कंत्राटदाराला सोडणार नाही, दोषींवर कारवाईचे संकेत देखील गडकरी साहेबांनी दिले.

विकासकामात नापास झालेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना नेत्यांच्या उलट्या बोंबा
झालेली घटना दुर्दैवी आहे, निश्चितच चौकशी होईल व दोषींवर कारवाई सुद्धा होणार. मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादी फक्त आणि फक्त विरोध करण्यासाठी राजकारण करीत आहेत. विकासकामाशी व जनतेच्या हिताशी यांचा दूरदूर पर्यंत संबंध नसून अगदी खालच्या पातळीचे राजकारण तिन्ही पक्षाचे नेते करीत आहे. मागील दोन वर्षापासून राज्यात तिघाडी सरकार आहे, मात्र एकही नवीन प्रोजेक्ट नागपूर शहराला या सरकारने दिला तर नाहीच, मात्र बेडकासारख्या ओरडणा-या या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी साधा पत्रव्यवहार सुद्धा केला नाही व प्रकल्प आणण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. नागपुरातील अनेक प्रकल्प शहरातील कॉंग्रेसी मंत्र्यांच्या उदासीनतेमुळे पुणे-मुंबईला खेचून काम देखील या सरकारच्या माध्यमातून झाले आहे. त्यामुळे हे सरकार महाराष्ट्राचे नसून पुणे-मुंबईचे आहे की काय? अशी शंका सहजच निर्माण होते.

भा.ज.प.च्या विकासकामात अडथळे आणण्यासाठी राज्य सरकार सज्ज
भा.ज.प. ने आणलेल्या विकासकामाला रोखण्याचे व अडचणीत आणण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. आधी विकासकामाचा निधी रोखणे, आडमुठ्या अधिका-यांना पाठविणे, विनाकारण तांत्रिक अडचणी निर्माण करणे अश्याप्रकारच्या अनेक अडचणी राज्य सरकार जाणीवपूर्वक निर्माण करीत आहे. याच पारडी, भंडारा रोडच्या रस्त्यावर अनेकदा अपघात झाले, कित्येक निर्दोष लोकांचा जीव गेला, अनेक परिवार बरबाद झाले. मात्र या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी रस्ते सुधारणा किंवा यावर उपाययोजना करण्याकरिता पुढाकार घेतला नाही. मी स्थायी समिती अध्यक्ष असताना पारडी ते सतरंजीपुरा डिव्हायडर टाकून वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले व नंतर गडकरी साहेब केंद्रात मंत्री होताच 100 टक्के केंद्र सरकारच्या निधीतून ब्रिजच्या कामाला शुरुवात झाली. आणि आज झालेल्या घटनेवर तल्या वाजविण्याचे काम हे तिन्ही पक्ष करीत आहे. जनता आशा संधीसाधू नेत्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.