Published On : Fri, Sep 10th, 2021

पारडी, भंडारा रोड ते प्रजापती चौक जडवाहनासाठी होणार बंद : पोलीस आयुक्त

Advertisement

आ.कृष्णा खोपडे, मेट्रो व NHAI अधिकारी व स्थानीय नगरसेवकांची पोलीस आयुक्तांसोबत बैठकीत निर्णय

नागपूर : पारडी ब्रिज व मेट्रोच्या कामामुळे एच.बी.टाऊन चौक व प्रजापती नगर चौक तसेच भंडारा रोडवर वाहतूक नियंत्रित करणे अधिकच कठीण झाले आहे. त्यामुळे आमदार कृष्णा खोपडे यांनी वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने महामेट्रो, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) चे अधिकारी, तसेच स्थानिक नगरसेवकांसोबत पोलीस आयुक्त यांची त्यांचे कार्यालयात बैठक घेतली. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पारडी भंडारा रोड ते प्रजापती नगर चौक या भागात जडवाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले. तसेच मेट्रो व पारडी ब्रिजचे काम 24 तास सुरु ठेवून कामाला गति देणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले.

आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले की, पारडी ब्रिज व मेट्रो रेल्वेचे काम भंडारा रोड येथे सुरु असून कंत्राटदाराच्या गलथान कारभारामुळे पारडी ब्रिजचे काम मंदगतीने सुरु होते. त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी यासंदर्भात अनेकदा नाराजी जाहीर केली व कडक शब्दात अधिकारी व कंत्राटदारांना दम दिल्यामुळे या भागातील सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र तरीसुद्धा एच.बी.टाऊन चौक, प्रजापती नगर चौक, पारडी जुना पूल व बाजार चौक या भागात वाहतुकीची मोठी वर्दळ पहायला मिळत होती. वाहतुकीमुळे होत असलेल्या या गर्दीमुळे या भागात केव्हाही दुर्घटना होण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन मी स्वत: हस्तक्षेप केला व यावर उपाययोजना करण्याचे दृष्टीने पोलीस आयुक्त यांचेकडे मेट्रो व NHAI च्या अधिका-यांसोबत बैठकीचा आग्रह केला. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी हा विषय गंभीरतेने घेऊन तातडीने या भागात जडवाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले व 24 तासात नोटीफिकेशन काढून अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले. तसेच मेट्रो व पारडी ब्रिजचे काम 24 तास सुरु ठेवून कामाला गति देणार असल्याचे अधिका-यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, आ.कृष्णा खोपडे, नगरसेवक प्रदीप पोहाणे, चेतना टांक, दिपक वाडीभस्मे, राजकुमार सेलोकर, वैशाली रोहनकर, देवेंद्र मेहर, मेट्रोचे एजीएम विकास नागुलकर, डीजीएम एस.रॉय, मॅनेजर राजेश तभाने, NHAI चे येवतकर, बिपुल चक्रवर्ती, अनंत घोष, आशिष सक्सेना, देवेंद्र बिसेन, अनिल कोडापे, मनोज अग्रवाल, नंदू चौधरी, वाहतूक व अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.