Published On : Wed, Mar 7th, 2018

जळगावसाठी समांतर रस्ते मंजूर

Advertisement

नवी दिल्ली : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चा काँक्रिटीकरणासह विस्तार आणि त्याच्या लगत डांबरीकरणाचे समांतर रस्ते तयार करण्याच्या १२५ कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.

येथील परिवह भवनात आज श्री. गडकरी यांच्या अध्यक्षतेत जळगाव जिल्ह्यातील रस्ते प्रश्नांबाबत बैठक झाली. या बैठकीस राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे आणि जळगावचे खासदार ए.टी.नाना पाटील, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे , जळगावचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर उपस्थित होते.

आजच्या बैठकीत जळगाव शहराचा समांतर रस्त्यांचा एक मुख्य प्रश्न मार्गी लागला. जळगाव शहरालगत महामार्ग विस्तारासाठी व समांतर रस्त्यांसाठी १२५ कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल( डिपीआर) समोर केला गेला. व त्यास मंजुरी देण्यात आली. महामार्ग विकास करताना समांतर रस्ते करण्याची जबाबदारी केंद्र सरकार कुठेही घेत नाही. पण, फक्त जळगाव शहरासाठी महामार्ग विस्तार व समांतर रस्त्यांचा हा आराखडा मंजूर करण्यात आल्याचे यावेळी श्री. खडसे यांनी सांगितले.

या बैठकीत जळगाव-औरंगाबाद महामार्ग विस्तार हा चौपदरी करावा अशी मागणी केली. यासोबत महामार्ग ६ वर वरणगावजवळ बायपास मंजूर असल्याने जुन्या महामार्गाच्या सुशोभिकरणासाठी निधी द्यावा आणि मुक्ताईनगरात जुन्या महामार्गाचे काँक्रिटीकरण व सुशोभीकरण करण्याची मागणी करण्यात आली. यासही मंजुरी देण्यात आली.

असा आहे सुधारित डीपीआर
कालिकामाता मंदिर ते खोटेनगर हा ७.३० कि.मी.चा महामार्ग काँक्रिचटा करणे, त्याच्या दोन्ही बाजूस समांतर रस्ते डांबरी करणे, गुजराल पंप, शिवकॉलनी व अग्रवाल हॉस्पिटल जवळ क्रॉसिंगसाठी बोगदे तयार करणे, दोन्ही बाजूला फुटपाथ व गटारी राहतील, मुख्य महामार्ग व समांतर रस्ते यात दोन मीटर दुभाजक असतील तसेच पथदिवे असतील.