| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, May 26th, 2017

  पनवेल महापालिका निकाल: पनवेलमध्ये भाजपला बहुमत, शेकाप महाआघाडीचा सुपडा साफ!

  bjp-flag

  Representational Pic


  नवी मुंबई
  : पनवेल महापालिका निवडणूकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपने आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार तब्बल 40 जागांवर विजय मिळवला आहे. तर 51 जागांवर भाजपची आघाडी आहे. शेकाप आणि महाआघाडीला हा मोठा धक्का देण्यात आला आहे. त्यामुळे आता शेकापच्या अस्तित्वाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात केवळ रायगड जिल्ह्यात शेकापचं अस्तित्व शिल्लक होतं आता तेही नाहीसं होणार असल्याचं चित्र आहे. पनवेल महापालिकेत भाजपने मुसंडी मारत सत्ता स्थापनेकडे वाटचाल केली आहे.

  भाजपने मतमोजणीच्या पहिल्या दोन तासात एकूण 78 पैकी 51 जागांवर आघाडी मिळवली आहे. पनवेलमध्ये पहिल्यांदाच महापालिका निवडणूका होत असल्याने सर्वांच्या नजरा या येथील निकालाकडे होत्या. शेकापला इथे मोठं यश मिळेल असे बोलले जात होते मात्र याही निवडणूकीत भाजपने आपली जादू कायम ठेवली आहे.

  नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेसाठी पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. 78 जागांसाठी 20 प्रभागातून उमेदवार निवडले जाणार आहेत. यामध्ये 18 प्रभागातून प्रत्येक 4 तर 2 प्रभागात 3-3 (6) उमेदवार महापालिकेत जातील. पनवेलमध्ये एकूण 53 टक्के मतदान झालं असून 418 उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल काही वेळात हाती येईल.

  भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्त्वात भाजप स्वबळावर लढत आहे. तर शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युती आहे. दुसरीकडे शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाआघाडी रिंगणात आहे. खरी लढत भाजप आणि महाआघाडीचीच आहे.

  पनवेल महानगरपालिका आतापर्यंतचे निकाल
  पक्ष आघाडी/विजयी
  भाजप 40
  शिवसेना 01
  शेकाप+काँग्रेस+ राष्ट्रवादी (महाआघाडी) -15
  मनसे 00
  इतर 00

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145