
छत्रपती संभाजीनगर: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणाआधी तांत्रिक अडचण आढळल्याने मोठी दुर्घटना टळली. लातूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या हेलिकॉप्टरने रवाना होणार होत्या. मात्र, वेळेत बिघाड लक्षात आल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाण रद्द करण्यात आले.
पंकजा मुंडे सध्या मराठवाड्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. आज लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सभांसाठी त्या छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावरून हेलिकॉप्टरने लातूरकडे जाणार होत्या. हेलिकॉप्टर आकाशात झेप घेण्याच्या तयारीत असतानाच वैमानिकाच्या लक्षात तांत्रिक दोष आला.
तत्काळ सुरक्षेचा विचार करत उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे संभाव्य मोठा अपघात टळल्याचे सांगण्यात येत आहे. पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणाआधीच अडचण लक्षात आल्याने आवश्यक खबरदारी घेण्यात आली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कार्यक्रमांच्या वेळापत्रकात बदल, पर्यायी हेलिकॉप्टरची व्यवस्था-
या घटनेमुळे लातूरमधील नियोजित सभांच्या वेळापत्रकात काहीसा बदल करण्यात आला आहे. कार्यकर्ते आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तातडीने दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली असून, त्या थोड्याच वेळात लातूरकडे रवाना होणार आहेत.
तांत्रिक अडचणीमुळे थोडा विलंब झाला असला तरी पंकजा मुंडे सर्व नियोजित सभांना उपस्थित राहणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यांच्या सुरक्षिततेची माहिती मिळताच समर्थकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून प्रचार दौरा नियोजनानुसार सुरू ठेवण्यात येणार आहे.








