नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर निर्माण झालेल्या दबावामुळे पाकिस्तानने अखेर भारताच्या सीमा सुरक्षा दलातील जवान पूर्णम कुमार शॉ यांना तब्बल २० दिवसांनी परत पाठवले. शॉ हे २३ एप्रिल रोजी चुकून पाकिस्तानच्या सीमेत गेले होते आणि त्यावेळी पाक रेंजर्सने त्यांना ताब्यात घेतले होते. बीएसएफने यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे.
बीएसएफच्या निवेदनानुसार, जवान शॉ यांना आज (१४ मे) अटारी-वाघा सीमेवर सकाळी १०:३० वाजता शांततेत आणि ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार भारताकडे सोपवण्यात आले. बीएसएफने यावेळी सांगितले की, जवानाची भारतात सुखरूप परतफेर झाली आहे.
पहलगाम हल्ल्याचा बदला ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे-
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने तात्काळ पावले उचलत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या मोहिमेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) असलेली ९ दहशतवादी केंद्रे नष्ट करण्यात आली. यामुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला होता आणि परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. या कारवाईत सुमारे १०० जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली होती.
पाकिस्तानच्या जवानालाही भारताने परत पाठवले-
दुसऱ्या बाजूला, बीएसएफनेही आपली परंपरा आणि नियमांची पूर्तता करत राजस्थानमधून पकडलेल्या पाकिस्तानी रेंजरला आज पाकिस्तानच्या हवाली केले. श्रीगंगानगर जिल्ह्याजवळील सीमारेषा ओलांडून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानी रेंजरला भारतीय जवानांनी अटक केली होती. मात्र, परस्पर विश्वास आणि शांततेच्या प्रक्रियेत सहभाग दर्शवत भारताने त्याला सुरक्षितरित्या परत पाठवले.
सीमारेषा ओलांडण्यामागील कारण-
जवान पूर्णम कुमार शॉ हे पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात शून्य रेषेजवळ गस्त घालत असताना सीमावर्ती शेतकऱ्यांना मदत करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. याचदरम्यान पाकिस्तानी सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर जवळपास तीन आठवडे ते पाकिस्तानच्या ताब्यात होते. मात्र आता, दोन्ही देशांच्या संबंधित यंत्रणांनी केलेल्या समन्वयानंतर शॉ यांची परतफेर शक्य झाली.
या संपूर्ण घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, सीमेवर सततचा तणाव असतानाही दोन्ही देश कधी कधी संयमाने आणि प्रोटोकॉलनुसार वागण्याचा मार्ग स्वीकारतात.