नागपूर : राज्य गृह विभागाने मंगळवारी पोलिस दलात मोठा प्रशासकीय बदल केला आहे. शहराचे सहआयुक्त म्हणून कार्यरत असलेले निसार तंबोळी यांची बदली करण्यात आली असून त्यांना राज्य राखीव पोलिस दल, नागपूर येथे विशेष पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
तंबोली यांच्या जागी आता अमरावती शहराचे विद्यमान पोलिस आयुक्त एन. डी. रेड्डी यांची नागपूरचे नवीन सहआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नागपूरमध्ये रेड्डी यांची पुनरागमन-
नवीनचंद्र रेड्डी हे यापूर्वी नागपूर शहरात अप्पर पोलिस आयुक्त पदावर कार्यरत होते. २०२३ साली त्यांची बदली करून त्यांना अमरावती शहराचे पोलिस आयुक्त म्हणून पाठवण्यात आले होते. प्रशासनातील कडक शिस्त, निर्णयक्षमता आणि संयम या गुणांमुळे रेड्डी यांची एक सक्षम आणि कठोर अधिकारी म्हणून ओळख आहे.
रेड्डी यांच्या पुनर्नियुक्तीमुळे नागपूर शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या नियंत्रणासाठी नव्या कार्यपद्धतीला चालना मिळण्याची शक्यता आहे. नागपूरच्या सुरक्षेची धुरा पुन्हा एकदा अनुभवी अधिकाऱ्यांच्या हाती गेली आहे.