Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Mar 6th, 2018

  जलसंवर्धनाच्‍या जनजागृती करीता चित्रकला स्‍पर्धा महत्‍वाचे माध्‍यम – महापौर नंदा जिचकार

  नागपूर: पाणी, वीज ही राष्‍ट्रीय संपत्‍ती असून त्याच्‍या संवर्धनासाठी प्रत्‍येकांनी प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्‍या चित्रकला स्‍पर्धांमधून जलसंवर्धनाचा महत्‍वाचा संदेश जनमानसापर्यंत प्रभावीपणे पोहचेल, असे मत नागपूरच्‍या महापौर नंदा जिचकार यांनी व्‍यक्‍त केले. केंद्रीय जलसंपदा, नदी विकास मंत्रालया अंतर्गत केंद्रीय भूजल मंडळ, नागपूर यांच्‍या वतीने स्‍थानिक धरमपेठ येथील ‘वनामती’ मध्‍ये 8 व्‍या राज्‍यस्‍तरीय चित्रकला स्‍पर्धेच्‍या पुरस्‍कार वितरण सोहळया प्रसंगी विशेष अतिथी म्‍हणून त्या बोलत होत्‍या. याप्रसंगी केंद्रीय भूजल मंडळाचे प्रादेशिक संचालक पी. के. परचुरे, अधिक्षक भूजल वैज्ञानिक पी. के. जैन, कार्यकारी अभियंता बी. पी. माथड, भूजल वैज्ञानिक राहुल शेंडे, प्रामुख्‍याने उपस्थित होते.

  थेंब थेंब पाण्‍याचे महत्वही अन्यनसाधारण आहे याची जाणीव ठेवून आपल्‍या घरातील गळणा-या नळाची दुरूस्‍ती करणे, रहिवासी इमारतीमध्ये पावसाच्‍या पाण्‍याचे संग्रहण (व्‍हार्वेस्टिंग) करणे आवश्‍यक आहे. शालेय विदयार्थ्‍यांनी आपल्‍या वाढदिवसानिमित्‍त वृक्षारोपण करून त्‍याचे संगोपन केल्‍यास पर्यावरण संवर्धन होईल, असे जिचकार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले.

  राज्‍यस्‍तरीय चित्रकला स्‍पर्धेत निवड झालेल्‍या व पुरस्‍कार न मिळालेल्‍याही पेटींग्‍ज केंद्रीय भूजल मंडळातर्फे प्रकाशित करण्‍यात येणा-या कॅलेंडर, डायरी तसेच टेबल बुक मधे समाविष्‍ट केल्‍या जात असतात, अशी माहिती केंद्रीय भूजल मंडळाचे अधिक्षक भूजल वैज्ञानिक पी. के. जैन यांनी यावेळी दिली,


  सुमारे 50 शालेय विदयार्थ्‍यांनी सहभाग नोंदविलेल्‍या या 8 व्‍या राज्‍यस्‍तरीय चित्रकला स्‍पर्धेचा प्रथम पुरस्‍कार (5000 रूपये व प्रशस्‍तीपत्र) विजेता नागपूर येथील सेंट झेवीयर स्‍कुलचा स्‍वयम डिंगलवार हा विदयार्थी ठरला. व्दितीय पुरस्‍कार (3000 रूपये व प्रशस्‍तीपत्र) मुंबईमधील विक्रोळीच्‍या उदयाचंल हायस्‍कुलच्‍या प्राची सौमेय्या तर तृतीय पुरस्‍कार (2000 रूपये व प्रशस्‍तीपत्र) शिवाजी हायस्‍कूल, मोर्शी (अमरावती) येथील वेदिका सुळे या विदयार्थीनीला मिळाला. याशिवाय 10 प्रोत्‍साहनपर पुरस्‍कारचे (प्रत्येकी ?000 रु. व प्रशस्तीपत्र) वितरणही मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.


  जलप्रदूषणाला आळा घालणे व जलसंवर्धनाला प्रोत्साहन देण्‍यासाठी केंद्रीय जलसंपदा, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयातर्फे प्रत्‍येक वर्षी शालेय, राज्‍य व राष्‍ट्रीय स्‍तरावर चित्रकला स्‍पर्धेचे आयोजन केले असून यावर्षी महाराष्‍ट्र राज्‍य व दादरा नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशाच्या शाळांमधील सुमारे 34 हजार विदयार्थ्‍यांनी शालेय चित्रकला स्‍पर्धेत सहभाग नोंदवला. यातील 50 सर्वोत्‍कृष्‍ठ पेटींग़्जची (चित्रांची) निवड नागपूरात होणा-या 8 व्या राज्‍यस्‍तरीय चित्रकला स्‍पर्धेसाठी निवड केली गेली व या 50 विदयार्थ्‍यांना आज धरमपेठ येथील वनामतीमध्‍ये चित्रकला स्‍पर्धेसाठी आमंत्रित केले होते. यावर्षीच्‍या चित्रकला स्‍पर्धेची मूळ संकल्‍पना ‘पाणी वाचवा, आयुष्‍य सुरक्षित करा’ ही होती. या राज्‍यस्‍तरीय चित्रकला स्‍पर्धेत पहिले तीन पुरस्‍कार विजेते नवी दिल्‍ली येथे होणा-या राष्‍ट्रीय चित्रकला स्‍पर्धेत महाराष्ट्र राज्‍याचे प्रतिनिधीत्‍व करणार आहेत.

  या पुरस्‍कार सोहळयाचे आभार प्रदर्शन केंद्रीय भूजल मंडळाचे भूजल वैज्ञानिक राहुल रोडे यांनी केले. या कार्यक्रमास महाराष्‍ट्राच्‍या विविध भागातून आलेले विदयार्थी, त्‍यांचे पालक व केंद्रीय भूजल मंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145