Published On : Thu, Aug 19th, 2021

पी.ओ.पी. बंदी नियमांची कडक अंमलबाजावणी करा महापौर दयाशंकर तिवारी यांचे निर्देश

Advertisement

नागपूर : मागील वर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीसंदर्भात काही नियम आणि निर्बंध होते. यावर्षी शासनाने पी.ओ.पी. मुर्तींवर बंदी घातली आहे. अर्थात पी.ओ.पी. मूर्तींची खरेदी आणि विक्री कायद्याने गुन्हा आहे. मूर्ती विक्रेत्यांनी आणि गणेश भक्तांनीही हे ध्यानात ठेवावे. महानगरपालिका व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या नियमांची कठोर अंमलबाजावणी करावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

प्लास्टिक ऑफ पॅरिस मूर्तीवरील बंदीच्या अंमलबजावणीसंदर्भात मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बुधवारी (ता. १८) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, आरोग्य समितीचे सभापती महेश (संजय) महाजन, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त राजेश भगत, विजय देशमुख, पशुचिकित्सक अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त विजय हुमने, हरिश राऊत, प्रकाश वऱ्हाडे, गणेश राठोड, किरण बगडे, सुषमा मांडगे, साधना पाटील उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, पी.ओ.पी. मूर्तीसंदर्भातील बंदीचे आदेश असल्याने त्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यासाठी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची आणि झोन सहायक आयुक्तांची जबाबदारी वाढली आहे. प्रत्येक मूर्तीकारांसाठी नोंदणी बंधनकारक केली आहे. या मूर्तीकारांना मूर्ती विक्रीसाठी झोननिहाय जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाहीसुद्धा तातडीने सुरू करण्यात यावी. पी.ओ.पी. मूर्तीसंदर्भात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यामुळे झोनस्तरावर जनजागृतीचा कार्यक्रम आखण्यात यावा. पी.ओ.पी. मूर्ती खरेदी आणि विक्री कायद्याने आता गुन्हा ठरतो. खरेदी अथवा विक्री केल्यास दहा हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त, दोन वर्षे बंदी याशिवाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायद्यान्वये फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. ही माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांचीही मदत घ्या, कचरा गाड्या, चौकातील ध्वनिक्षेपक आदी ठिकाणांहून यासंदर्भात माहिती देणाऱ्या ऑडियो क्लिप प्रसारित करा, अशी सूचनाही महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केली.

कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक टास्क फोर्स तयार करा. माती मूर्ती तयार करणारा व्यक्ती, पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीचाही यात समावेश असावा. विसर्जन करताना पीओपी मूर्ती आढळली तर भक्तांवरही कारवाई करण्यात येईल, असेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. पीओपी मूर्ती बंदीसंदर्भात अंमलबजावणीसाठी प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती उपायुक्त राजेश भगत, विजय देशमुख तसेच नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.

टोल फ्री क्रमांक
पीओपी मूर्तीसंदर्भात माहिती आणि तक्रारींसाठी मनपा मुख्यालयात टोल फ्री क्रमांक जाहीर करा. मनपाच्या अधिकृत सोशल मीडियावरून, वृत्तपत्रातून हा क्रमांक नागरिकांपर्यंत पोहचवा. त्यावर येणाऱ्या तक्रारींची त्वरित दखल घ्या. वृत्तपत्र आणि अन्य माध्यमातून जाहिराती देऊन नागरिकांना यासंदर्भात जागृत करा, असेही निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

डेंग्यूविषयक जनजागृतीसाठी झोननिहाय पुरस्कार
गणेश उत्सव जनजागृतीचे आणि लोकप्रबोधनाचे उत्कृष्ट माध्यम आहे. यावर्षी नागपुरात डेंग्यूचा प्रकोप आहे. गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून डेंग्यू, मलेरिया याविषयी जनजागृती करण्यात यावी. यासाठी झोननिहाय तीन पुरस्कारांची घोषणा करण्यात यावी, अशी सूचनाही महापौरांनी यावेळी केली.