Published On : Thu, Aug 19th, 2021

नरसाळा परिसरातील नदी – नाल्यावरचे अतिक्रमण त्वरित हटवा : महापौर

नागपूर: नागपूर महानगर पालिका आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी संयुक्तरीत्या कारवाई करून मौजा गोंन्ही सीम आणि मौजा नरसाळा सीमेलगत पोहरा नदीवर व त्यालगत नाल्यावर अतिक्रमण करण्याऱ्याविरुद्ध कारवाई करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीत आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी आर. विमला, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त तथा नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मुख्य अभियंता लिना उपाध्ये, अधीक्षक अभियंता अभय पोहेकर आणि कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बनर्जी, राजेश भूतकर उपस्थित होते.

मौजा गोंन्ही सीम आणि मौजा नरसाळा परिसरातून वाहणाऱ्या नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहास काही बिल्डरांनी अवैधरित्या बांधकाम करुन अरुंद केल्यामुळे वसाहतीमधील संपूर्ण सांडपाणी आजूबाजूच्या परिसरात उघड्यावर सोडलेले आहे. उघड्यावर सोडलेले पाणी उन्हाळ्यातदेखील खुल्या भूखंडामध्ये साचून राहत आहे. सद्यस्थितीत परिसरात पावसाचे पाणी प्रवाहित झाल्यामुळे व नैसर्गिक नाल्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण झाल्यामुळे सदर भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आमदार सावरकर यांनी सांगितले कि, नाल्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत करणे अत्यंत आवश्यक असून मनपा आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी संयुक्त कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत येणा-या भूमि अभिलेख विभागाकडून नाल्याच्या जागेचे मोजमाप करण्याचे आदेश ही त्यांनी दिले. महापौरांनी अवैधरित्या बांधकाम करणा-या विकासाला नोटीस देण्याचे निर्देश दिले. तसेच ज्यांनी नाल्यावर अतिक्रमण करून प्रवाह अरुंद केला आहे त्यांच्याविरुद्व कडक कारवाई करण्याचे निर्देश सुध्दा प्रशासनाला दिले आहे.