Published On : Fri, Jun 18th, 2021

आता ऑक्सीजन बाहेरून आणण्याची गरज पडणार नाही : ना. गडकरी

श्री. भवानी हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन प्लाण्टचे लोकार्पण

नागपूर: ऑक्सीजन निर्मितीमध्ये आपण हळूहळू स्वयंपूर्ण होतो आहेत. अनेक नवीन प्लाण्ट सुरु होण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता ऑक्सीजन आपल्याला बाहेरून आणण्याची गरज पडणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पूर्व नागपुरातील पारडी येथील श्री. भवानी हॉस्पिटलमधील ऑक्सीजन प्लाण्टचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आ. कृष्णा खोपडे, हॉस्पिटलचे अध्यक्ष पांडुरंग मेहर, उपमहापौर मनीषा दावडे, संजय भेंडे, चंदूजी पेंडके, प्रमोद पेंडके आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- ऑक्सीजन सिलेंडरची कमतरताही पडणार नाही अशी व्यवस्था करा.

शेजारच्या हॉस्पिटलला लागणारा ऑक्सीजनही आपण पुरवू शकू एवढा ऑक्सीजन येथे निर्माण होणार आहे. गरीब माणसाची सेवा येथे झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करताना ना. गडकरी पुढे म्हणाले- या हॉस्पिटलमध्ये हृदय रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी कॅथलॅब निर्माण करण्यासाठी लागणारा निधीही सीएसआर फंडातून उपलब्ध करून देऊ. तसेच ऑक्सीजन प्लाण्टसोबतच रिफिलिंग प्लाण्ट लावण्यासही आपण सहकार्य करू.

पारडीच्या उड्डाणपुलाचे काम लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश आपण दिले असून खाली रस्ता, मध्यात उड्डाणपूल आणि त्याच्या वरच्या भागाला मेट्रो राहणार आहे. याशिवाय ब्रॉडगेज मेट्रोही लवकरच सुरु होणार आहे. वर्धा येथे 35 मिनिटिात, भंडारा येथे 35 मिनिटात आपण पोहोचू शकणार आहे.

श्री भवानी हॉस्पिटल 110 बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. ना. गडकरी यांच्या सहयोगाने हॉस्पिटलमध्ये 2 ऑक्सीजन प्लाण्ट सुरु करण्यात आले आहे. याप्रसंगी हॉस्पिटलतर्फे करण्यात येणार्‍या चिकित्सा सेवांची प्रशंसाही ना. गडकरी यांनी केली. कोरोना काळात यशस्वी सेवा देणार्‍या डॉक्टरांचा सत्कारही याप्रसंगी ना. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात डॉ. कौस्तुभ उपाध्ये, डॉ. अभिजित ढवळे, डॉ. शीतल मदनकर, डॉ. दीप्ती शेंडे, डॉ. रमेश हसानी, डॉ. सुधावा भूत, डॉ. क्षितिज गुल्हाने, डॉ, सुनीता मिगलानी, मनीष केडिया, मुकेश हटवार आदींचा समावेश आहे.

या कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक श्री भवानी माता सेवा समितीचे सचिव हरिदास वाडीभस्मे यांनी तर आभार नितीन अरसपुरे यांनी मानले. याप्रसंगी बटुकभाई बगडिया, राजन ढ्ढा, देवेंद्र टावरी, मिलिंद ठवकर, अशोक अंबागडे, दिवाकर थोपटे, नरेंद्र ठवकर, राजू दिवटे, अतुल कोटेचा, मंगेश आतिलकर, दीपक वाडीभस्मे, ज्ञानेश्वर मानकर, नरेंद्र बोरकर, प्रदीप पोहाने, सौ. मनिषा अतकरी, चेतना टाक, संजय अवचट, मनोज चाफले, जयश्री रारोकर, देवेंद्र मेहर, आदी उपस्थित होते.