Published On : Fri, Sep 18th, 2020

साडेसहा हजारांत शेतकऱ्यांनी कुटुंबाला सावरावे कसे? : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्तांकरिता आणि शेतकऱ्यांच्या मदतीकरिता जो जीआर काढला आहे, हा काळा जीआर आहे, तो शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा आहे, विदर्भावर अन्याय करणारा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विदर्भाकडे अजिबात लक्ष नाही, असा घणाघाती आरोप राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला. या जीआरची त्यांनी आज होळी केली.

शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी करावयाच्या उपाययोजनांच्या मागणीचे निवेदन त्यांनी आज विभागीय आयुक्तांना दिले. आम्ही सर्वांनी मागणी केली होती की, ५० हजार रुपये हेक्टरी सोयाबीन, कापूस, धान, आणि मिरची पिकाला अनुदान द्यावे. तब्बल दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे आणि सरकारने केवळ १६.४८ कोटी रुपये दिले आहेत. यामध्ये केवळ साडेसहा हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मिळणार आहेत. शेतकरी संपूर्ण उद्वस्त झाला आणि साडेसहा हजार रुपयांत त्याने स्वतःला, कुटुंबाला कसे सावरावे, हे सरकारनेच आता सांगावे, असे श्री बावनकुळे म्हणाले.

संत्र्याचा पट्टा म्हणून ओळखला जात असलेल्या काटोल, नरखेड भागातली मोसंबी पूर्णपणे उद्धस्त झाली. १८ – १८ लाख रुपयांचे बगीचे १० हजार रुपयांत घ्यायला कुणी तयार नाहीये. अशा परिस्थितीत विदर्भाकडे कुणाचेच लक्ष नाही. जो जीआर काढला, त्यामध्ये सानुग्रह अनुदान नाही. आजच्या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना खावटी मिळालेली नाही. घराच्या बांधकामाचे अडीच लाख रुपये लोकांना मिळाले नाहीये. अजूनही पूरग्रस्त भागातील सर्वस्व गमावलेले लोक अंगणवाड्या आणि समाजमंदिरांमध्ये राहत आहेत. १० हजार परिवारांचे प्रचंड हाल होत आहेत.

कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असताना सरकारने अतिरेक केला आहे. नागपूर आणि संपूर्ण विदर्भावर सरकारचे अजिबात लक्ष नाहीये. सरकार झोपलेले आहे. आज निर्माण झालेल्या भयाण परिस्थितीमुळे लोक आत्महत्या करत आहे, याला सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याचा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. आज विभागीय कार्यालयात केलेल्या आंदोलनात आमदार गिरीश व्यास आणि आमदार समीर मेघे उपस्थित होते.