नवी दिल्ली -पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या महत्त्वपूर्ण कारवाईविषयी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत सविस्तर माहिती दिली. विरोधकांच्या गदारोळानंतर आज दुपारी २ वाजल्यापासून या चर्चेला सुरुवात झाली.
राजनाथ सिंह म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या लष्करी इतिहासातील एक ऐतिहासिक कारवाई ठरली आहे. ६ आणि ७ मेच्या रात्री भारताने पाकिस्तानात घुसून केवळ दहशतवाद्यांनाच लक्ष्य केले. या कारवाईत सुमारे १०० दहशतवादी, त्यांच्या ट्रेनर आणि हँडलर्सचा खात्मा करण्यात आला.”
पहलगाम हल्ल्याचा क्रूर बदला-
संरक्षणमंत्र्यांनी सभागृहात सांगितले की, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी लोकांचा धर्म विचारून निर्घृण हत्या केली. हा हल्ला अमानवी आणि संतापजनक होता. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने तिन्ही सैन्यदल प्रमुखांशी बैठक घेत निर्णायक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले.
दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारलं-
सिंह म्हणाले, “भारतीय सैन्याने आमच्या माता-भगिनींच्या पुसलेल्या कुंकवाचा बदला घेतला आहे. मी खूप जपून बोलतोय – आमच्या जवानांनी हे वीरतेने केलं. ही कारवाई केवळ दहशतवाद्यांच्या अड्ड्यांपुरती मर्यादित होती. युद्ध सुरू करण्याचा कोणताही हेतू नव्हता.”
पाकिस्तानकडून प्रत्युत्तराचा प्रयत्न, भारताचं सडेतोड उत्तर-
या कारवाईनंतर पाकिस्तानने भारतीय सैनिकी केंद्रांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय संरक्षण यंत्रणांनी हे हल्ले निष्फळ ठरवले. भारताने नंतर अत्यंत मोजकं आणि तोलून-मापून प्रत्युत्तर दिलं. राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, “१० मे रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील काही हवाई तळांवर मोठा हल्ला केला, ज्यामुळे पाकिस्तानला युद्धविरामाची विनंती करावी लागली.”
ऑपरेशन सिंदूर सध्या स्थगित, पण गरज पडल्यास पुन्हा सुरू होणार-
सिंह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरचा उद्देश दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्याचा होता, युद्ध छेडण्याचा नव्हे. ही कारवाई केवळ भारतविरोधात षडयंत्र रचणाऱ्यांविरोधात होती. सध्या हे ऑपरेशन स्थगित करण्यात आलं आहे. मात्र पाकिस्तानकडून पुन्हा आगळीक झाल्यास ते नव्या जोमाने सुरू होईल.ऑपरेशन सिंदूरमुळे भारताने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर आपली दहशतवादाविरोधातील ठाम भूमिका स्पष्ट केली आहे. सैन्याच्या या धाडसी कारवाईमुळे देशभरात अभिमानाची लाट उसळली आहे.