Published On : Thu, Nov 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील नारायण विद्यालयाचा संतापजनक प्रकार;फी भरली नाही म्हणून चौथीच्या विद्यार्थिनीला परीक्षेबाहेर काढले!

मुख्याध्यापकांसह शिक्षिकेवर गुन्हा
Advertisement

नागपुरातील नारायण विद्यालयाचा संतापजनक प्रकार;फी भरली नाही म्हणून चौथीच्या विद्यार्थिनीला परीक्षेबाहेर काढले!

नागपूर : शाळेची फी थकली म्हणून एका नऊ वर्षीय चिमुरडीच्या शिक्षणाच्या हक्कावरच गदा आणल्याचा संतापजनक प्रकार नागपूरच्या बोखारा परिसरातील नारायण विद्यालयात समोर आला आहे. चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला फी भरली नसल्याचे कारण देत हिंदीची परीक्षा देण्यापासून रोखण्यात आले. विशेष म्हणजे, तिचे वर्गमित्र परीक्षा देत असताना या चिमुरडीला मात्र ग्रंथालयात बसविण्यात आल्याचा आरोप आहे. अवघ्या नऊ वर्षांच्या मुलीला इतर विद्यार्थ्यांसमोर अपमानित केल्याप्रकरणी आता शाळेच्या मुख्याध्यापकांसह वर्गशिक्षिकेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० दरम्यान हा प्रकार घडला. शाळेची फी थकीत असल्याने विद्यार्थिनीला परीक्षेचे हॉल तिकीट देण्यात आले नाही. परिणामी, तिला परीक्षेला बसण्याची परवानगी नाकारण्यात आली. इतर विद्यार्थी परीक्षेत व्यस्त असताना तिला ग्रंथालयात बसविण्यात आले. या प्रकारामुळे मुलीला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे पालकांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच थकीत शुल्काच्या कारणावरून कुटुंबीयांवर दबाव आणून धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाने या प्रकरणाचा अहवाल सादर केला. त्याआधारे ४ नोव्हेंबर रोजी कोराडी पोलिसांनी वर्गशिक्षिका आणि मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा नोंदविला. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १६, १७ आणि २९ तसेच बाल न्याय अधिनियम २०१५ मधील कलम ७५ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

फी थकली म्हणून विद्यार्थ्याला परीक्षेपासून दूर ठेवणे कितपत योग्य? या घटनेने शाळांच्या शुल्कवसुलीच्या पद्धतींसह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रकरणाचा पुढील तपास कोराडी पोलीस करीत आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.