
नागपूर : गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादातून एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कॉटन मार्केटजवळील गुरुकृपा अमर भोजनालय परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. भोजनालयासमोर झोपलेल्या युवकावर आरोपीने कथितरित्या फावड्याने हल्ला केला. या हल्ल्यात युवकाच्या डोक्याला आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ यादव यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जखमी जम्मील सैयद शफी सैयद आणि आरोपी सुमित उर्फ गोलू तायडे हे दोघेही रेल्वेत चिवडा विक्रीचे काम करतात. रात्री अंदाजे २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान जम्मील हा गुरुकृपा अमर भोजनालयासमोर झोपला होता.
याचवेळी आरोपी सुमित उर्फ गोलू तायडे तेथे आला. दोघांमध्ये पूर्वीपासून वाद असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. याच जुन्या वादातून आरोपीने जम्मीलवर फावड्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर आणि डाव्या हातावर वार झाले असून तो गंभीर जखमी झाला.
या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी तक्रारीच्या आधारे हत्येच्या प्रयत्नाशी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपी सुमित उर्फ गोलू तायडे याला अटक केली आहे. पुढील तपास गणेशपेठ पोलीस करत आहेत.



