नागपूर : राज्याच्या उपराजधानीत वातावरणात गारवा जसजसा वाढू लागतो तशा खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या ऊबदार आठवणी ताज्या होऊ लागतात.यंदाचा खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे (2024) आयोजन येत्या 13 ते 22 डिसेंबरला हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता सहा फिल्मफेअर पुरस्कारांची मानकरी आपल्या अभिनयाची छाप सोडणारी प्रसिद्ध अभिनेत्री पद्मश्री काजोल यांच्या हस्ते होणार आहे. काजोल यांची उपस्थिती यंदाच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला नवी झळाळी देणारी ठरेल.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आठ वर्षांपूर्वी म्हणजे 2017 साली खासदार सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला होता. यंदाचे हे महोत्सवाचे नववे पर्व आहे.
सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात होणाऱ्या या महोत्सवात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी नागपूरकरांना मिळणार असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांसोबतच स्थानिक कलाकारदेखील या मंचावर आपली कला सादर करतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आठ वर्षांपूर्वी म्हणजे 2017 साली खासदार सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला होता. यंदाचे हे महोत्सवाचे नववे पर्व आहे. वर्षागणिक त्याचे स्वरूप अधिक भव्य होत असून त्याची ख्याती देशभरात पसरलेली आहे. इतर खासदारांसाठी प्रेरणादायी ठरलेला महोत्सव यंदा नवनवीन कार्यक्रमांची शृंखला घेऊन येत आहे.
राममय होणार नागपूरकर –
प्रसिद्ध हिंदी कवी, वक्ते, कथावाचक तसेच, सामाजिक-राजकीय कायकर्ते डॉ. कुमार विश्वास यांचा ‘अपने अपने राम’ हा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम 14 ते 16 डिसेंबर दरम्यान दररोज सायंकाळी 7 वाजता होणार आहे. देश-विदेशात गाजलेल्या या तीन दिवसीय रामकथेतून डॉ. कुमार विश्वास हे वाममार्गाला जात असलेल्या युवापिढीला राममार्गावर आणण्याचे अत्यंत प्रशंसनीय कार्य करीत आहेत.
‘अभंगवारी’ व ‘अभिजात मराठी’-
आषाढी पायीवारीच्या सुख सोहळ्याचे हरिभक्तांना दर्शन घडविण्यासाठी 17 तारखेला ‘अंभगवारी’ हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. 2000 वारकरी कलाकारांच्या माध्यमातून नाट्य, नृत्य, संगीत व टाळमृदुंगाच्या गजरात रोमांचक असे उभे रिंगण सादर करतील. 18 तारखेला होणा-या ‘अभिजात मराठी’ या कार्यक्रमातून संत ज्ञानेश्वर, चार्वाक, संत तुकारामांपासून ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकरांपर्यंत सर्वांना मानाचा मुजरा करणा-या या कार्यक्रमात अजित परब, मुग्धा वैशंपायन, सावनी रविंद्र, सोनिया परचुरे, संकर्षण क-हाडे, आनंद इंगळे, मृण्मयी देशपांडे, भार्गवी चिरमुले, गिरीजा ओक यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश राहील.
चार लाईव्ह इन कॉन्सर्ट्स-
चार दिवस सलग ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट्स’ आयोजित करण्यात आल्या आहेत. 19 तारखेला उत्तर व दक्षिणेतील वाद्यांची ‘इन्स्ट्रूमेंटल फ्यूजन’ कॉन्सर्ट होणार असून त्यात निलाद्री कुमार, राकेश चौरसिया, तौफिक कुरेशी व ओजस आडिया या कलाकारांचा सहभाग राहील. 20 रोजी भारतातील सर्वाधिक लोकप्रिय पॉप रॉक संगीत समूह ‘सनम बँड’ ची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ होणार असून यात सनम पुरी, समर पुरी, केशव धनराज, व्यंकट सुब्रमण्यम यांचा समावेश राहणार आहे. 21 तारखेला तीन दशकांहून अधिक काळ बॉलिवुडच्या संगीतविश्वावर राज्य करणारे ‘पापा कहते है’ फेम गायक उदीत नारायण यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ आणि समारोपाच्या दिवशी 22 तारखेला ‘कैसे हुआ’ फेम गायक, संगीतकार विशाल मिश्रा यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ तरुणाईला वेड लावेल.
सकाळचे भक्तीमय सत्र –
मागील वर्षी प्रमाणे यंदाही खासदार सांस्कृतिक महोत्सवात 14 ते 22 डिसेंबर या कालावधीत दररोज सकाळी 7 ते 8.30 वाजेदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात श्री हनुमान चालिसा पठण, श्रीरामरक्षा स्तोत्र व श्री मारुती स्तोत्र सामुहिक पठण, श्री रुद्र पठण, श्री हरिपाठ पठण, श्री गणपती अथर्वशीर्ष पठण, श्री गजानन विजय ग्रंथाच्या 21 व्या अध्यायाचे पारायण, मनाचे श्लोक, श्री सुंदरकांड पठण आणि श्रीसुक्त पठण यांचा समावेश राहणार आहे. याशिवाय, सायंकाळच्या सत्रातील मुख्य कार्यक्रमांच्या आधी स्थानिक बाल कला अकादमीच्यावतीने स्वा. सावरकरांवर आधारित देशभक्तीपर गीत, नृत्य, नाट्याने नटलेला कार्यक्रम होणार आहे. यात शहरातील विविध शाळातील सुमारे 250 मुले गायन, वादन, नृत्य व नाट्याच्या माध्यमातून सादरीकरण करतील. तसेच, दृष्टीबाधित मुलांचा आर्केस्ट्रादेखील आयोजित करण्यात आला आहे. कोणत्याही अडथळ्याविना या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी यंदा क्युआर कोडद्वारे मोफत पासेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दरम्यान या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला नागपूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर आणि इतर मान्यवरांनी केले.