| | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Feb 11th, 2018

  जैविक शेतीस सर्वोच्च प्राधान्य – केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्रीमती कृष्णा राज

  कोल्हापूर : देशाच्या सर्वांगिण विकास आणि उन्नतीसाठी केंद्र शासनाने भर दिला असून समृध्द शेतीसाठी शेती विकासाच्या अनेकविध योजना हाती घेतल्या आहेत. देशात जैविक शेती उत्पादन वाढीसाठी जैविक शेतीसही प्राधान्य दिले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्रीमती कृष्णा राज यांनी आज येथे बोलताना केले.

  कणेरी येथील श्री क्षेत्र सिध्दगिरी मठामध्ये आयोजित केलेल्या 5 दिवसीय सिध्दगिरी कारागीर महाकुंभ कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते आज करण्यात आला. त्याप्रसंगी समारंभाच्या अध्यक्षपदावरुन श्रीमती कृष्णा राज बोलत होत्या. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, राजकोट येथील स्वामी नारायण संस्थांनचे स्वामी श्री त्यागवल्लभदास, रायबरेली संस्थांनचे बडेराजा श्री कौशलेंद्रसिंह, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, श्रीमती अंजली चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

  जैविक शेती ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट करुन केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्रीमती कृष्णा राज म्हणाल्या, समृध्द शेतीसाठी जैविक शेती बरोबरच पशुपालनावरही शासनाने भर दिला आहे. शेतीचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांना बाजारपेठा उपलब्ध करुन देणे या गोष्टीसह केंद्र शासनाने प्राधान्य दिले आहे. शेती बरोबरच आरोग्य, वीज, पाणी, घरकुल अशा गोष्टींनाही शासनाने भर दिला असून अर्थसंकल्पात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेसाठी क्रांतीकारी आरोग्य योजना सुरु केली असल्याचे त्यांनी सांगितले.

  भारताला फार मोठी संस्कृती आणि परंपरा लाभली असून विविधतेतून एकता जोपसण्याचं महान काम देशात होत आहे. केंद्र शासनाने ‘सबका साथ सबका विकास’ या घोष वाक्यानुसार भारताच्या सर्वांगिण विकासावर भर दिला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये कारागिरीला अनन्य साधारण महत्त्व असून देशात कारागिरीला प्राधान्य देऊन देशाला गतवैभव प्राप्त करुन देण्याच्या दृष्टीने शासनाने शेती आणि शेतीवर आधारित उद्योग व्यवसायांना प्राधान्य दिले आहे. कणेरी मठात जैविक शेती, पशुपालनाबरोबरच कारागिरीच्या दृष्टीने होत असलेले प्रयोग आणि संशोधन अतिशय महत्त्वाचे असून याचे देशभर अनुकरण व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

  स्वयंपूर्ण गावासाठी शेती व शेती आधारित व्यवसायांना बळ – पालकमंत्री

  महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण गावासाठी ग्रामीण भागातच शेती आणि शेतीवर आधारित उद्योग व्यवसायांना बळ देऊन तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगारातून स्वावलंबी बनविण्याच्या कामास शासनाने प्राधान्य दिले असून राज्य शासनाने कौशल्य विकासही नाविन्यपूर्ण योजना सुरु करुन उद्योग व्यवसायासाठी कुशल तरुण निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे.

  श्री क्षेत्र सिध्दीगिरी मठाने भारतीय संस्कृतीचे दर्शन आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करुन जैविक शेती अशा अनेकविध उपक्रमातून लोकांना विशेषत: शेतकऱ्यांना नवी दिशा देण्याचं काम हाती घेतलं असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सिध्दीगिरी मठातील विविध उपक्रमातून शेतकऱ्यांना प्रेरणा मिळणार असून भारतीय संस्कृती आणि परंपरेच्या शिकवणी बरोबरच आधुनिक शेतीचं तंत्र येथे जोपासलं जात आहे. या परिसरातील रस्ते विकासासाठी 3 कोटी 50 लाखाचा निधी विविध योजनातून उपलब्ध करुन दिला जाईल तसेच संस्थांनच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी 85 लाखाची कामे मंजूर करण्यात येतील अशी ग्वाही पालकमंत्री यांनी दिली. या कारागीर महाकुंभ सोहळ्यास त्यांनी शुभेच्छा दिल्या.

  याप्रसंगी बोलताना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले, भारतीय संस्कृतीची जोपासणा करण्याबरोबरच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या आधारे नैसर्गिक/जैविक शेतीचे सुत्र जोपासून सिध्दगिरी मठाने जनतेला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. कारागीर महाकुंभ सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामीण कारागिरीचे यथार्त दर्शन घडविले आहे. या महाकुंभ सोहळ्यातून शेतकऱ्यांना आणि कारागिरांना नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  याप्रसंगी राजकोट येथील स्वामी नारायण संस्थांनचे स्वामी श्री त्यागवल्लभदास, रायबरेली संस्थांनचे बडेराजा श्री कौशलेंद्रसिंह आदींची समयोचित भाषणे झाली. प्रारंभी श्री क्षेत्र सिध्दगिरी मठाचे मठाधिपती काडसिध्देश्वर स्वामी यांनी स्वागत करुन प्रस्ताविकात कारागीर महाकुंभ सोहळ्याची संकल्पना विषद केली.

  भव्य शोभा यात्रा
  श्री क्षेत्र सिध्दगिरी मठामध्ये आयोजित केलेल्या सिध्दगिरी कारागीर महाकुंभ सोहळ्यानिमित्त सिध्दगिरी मठ परिसरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेचा शुभारंभ रायबरेली संस्थांनचे बडेराजा श्री कौशलेंद्रसिंह यांच्याहस्ते करण्यात आला. या शोभा यात्रेमध्ये अग्रभागी भजनी मंडळाने टाळमृंदगाच्या निनादात ग्यानबा तुकारामचं ठेका धरला होता. तर हलगी, लेझिम, धनगरी ढोल यांनी परिसर दणाणून गेला.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145