नागपूर — उपराजधानी नागपूरमध्ये गुन्हेगारीची संख्या राज्याच्या तुलनेत कमी असून विरोधक केवळ नागपूरला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यातील चर्चेला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. त्यामुळे काहीजण जाणीवपूर्वक चुकीचे आरोप करून शहराची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, उपलब्ध आकडेवारीनुसार नागपूरमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण राज्याच्या इतर भागांपेक्षा कमी आहे.
हुक्का पार्लरवर सरकारचा कारवाईचा बडगा, तीन वेळा दोषी आढळल्यास परवाना कायमचा रद्द-
राज्यात वाढत चाललेल्या अवैध हुक्का पार्लरच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, “आपण यापूर्वी अशा पार्लरवर एक आठवडा किंवा एक महिना परवाना रद्द करून कारवाई करत होतो. पण त्यानंतर तेच व्यवसाय पुन्हा सुरू होतो.”
आता आम्ही निर्णय घेतला आहे की, जर एखादा हुक्का पार्लर मालक तीन वेळा अवैधरीत्या हुक्का पिलवताना सापडला, तर त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाईल,असं मुख्यमंत्री म्हणाले.
सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हुक्का पार्लर चालकांमध्ये खळबळ माजली आहे आणि भविष्यात या व्यवसायावर नियंत्रण आणण्याची शक्यता वाढली आहे.