नागपूर – नागपूर सेंट्रल जेलमध्ये कैद्यांमधील हिंसक वाद शांत होण्याचे नाव घेत नाहीत. बुधवारी पुन्हा एकदा जेलमध्ये झालेल्या क्रूर घटनेमुळे खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या गुप्तांगावर दातांनी चावा घेत गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी दुपारी सुमारे २.३० वाजता सेंट्रल जेलच्या मोठ्या गोल बैरकमध्ये घडली. न्यायप्रविष्ट कैदी शुभम ठाकूर झोपेत असताना कृष्ण रमेश तिवारी या कैद्याने जोरात आवाज करून त्याला उठवले. झोपमोड झाल्याने संतापलेल्या शुभमने कृष्णला चापट मारली. यानंतर दोघांमध्ये शिवीगाळ व मारहाण सुरू झाली.
या झटापटीदरम्यान कृष्ण तिवारीने अमानुषतेची परिसीमा ओलांडत शुभमच्या गुप्तांगावर दातांनी चावा घेत गंभीर जखमी केले. शुभमच्या किंकाळ्या ऐकून सुरक्षा रक्षक विनोद कचडे घटनास्थळी धावत आले आणि त्यांनी हस्तक्षेप करत दोघांना वेगळं केलं.
गंभीर जखमी झालेल्या शुभम ठाकूरला तातडीने जेलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात आरोपी कृष्ण रमेश तिवारीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.