स्वतःचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी विरोधक घेत आहेत आरोपांचा आधार
नागपूर : कळमना येथील निर्माणाधीन पुलाच्या बांधकामाचा एक भाग पडला ही घटना दुर्दैवी आहे. मात्र या संदर्भात विरोधकांकडून होत असलेले आरोप पूर्णतः खोटे आणि तर्कहीन आहेत. २५ वर्ष केंद्र आणि राज्यातील सरकारमध्ये मंत्रिपद उपभोगून नागपूर शहरासाठी एकही काम करू न शकलेले विरोधक स्वतःचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी आरोपांचा आधार घेत आहेत, असा आरोप भाजपाचे प्रवक्ते ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.
पारडी कळमना मार्गावरील निर्माणाधीन पुलाच्या बांधकामाचा एक भाग पडल्यानंतर विरोधकांकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर होत असलेल्या निरर्थक आरोपांचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून खंडन केले.
ते म्हणाले, सगळीकडे पूल पडला म्हणून ओरड पाडली जात आहे. मात्र या भागात पुलाचे बांधकाम सुरू असून त्याचा एक भाग पडला ही वस्तुस्थिती आहे. काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे निरीक्षण, परीक्षण आणि चाचणी नंतर पूल वाहतुकीसाठी खुला केला जातो. त्यामुळे या घटनेला पूल पडला असे संबोधणे चुकीचे आहे. या निर्माणाधीन बांधकामाचा ढाचा पडणे ही घटना दुर्दैवी आहे. बांधकाम कार्यात अशा घटना घडू नयेत पण त्या घडण्याचा धोका टाळता येत नाही. तीच बाब कळमना पारडी मार्गावरील पुलाच्या निर्माणाधीन बांधकामसंदर्भात सुद्धा घडली. मात्र या सर्वांमध्ये केवळ आकस म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर आरोप करणे ही अत्यंत चुकीची बाब आहे, असेही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केवळ नागपूर शहरातच नव्हे तर संपूर्ण भारतात ज्या वेगाने आणि जोमाने त्यांनी काम केले आहे देशात ते एकमेवाद्वितीय उदाहरण ठरले आहेत. त्यांनी पूर्ण प्रामाणिकपणे नागपूर शहरात, संपूर्ण देशात उत्कृष्ट रोड, पूल बांधले आहेत, ही बाब नागपूरकर म्हणून अभिमानास्पद आहे. सदर घटनेसंदर्भात तात्काळ दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चौकशी समिती गठीत केली आहे. यामध्ये तिघांचे निलंबनही झाले असल्याची माहिती आहे. अशा स्थितीत संपूर्ण कार्याची पुरेपूर चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल पुढे येणार नाही तोपर्यंत काय त्रुट्या राहिल्या, कुठे चूक झाली याचा अंदाज लावता येणार नाही.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यपद्धतीवर संपूर्ण नागपूरकरांचा विश्वास आहे. घडलेल्या घटनेसंदर्भात पुढील काळात वस्तुस्थिती समोर येईल व यामध्ये चांगले काम झाल्याचे पुढे येईल, असा विश्वास ऍड. मेश्राम यांनी व्यक्त केला.
अशा स्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर ते म्हणाले, आज आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पदार्पण केले आहे. या ७५ वर्षात सर्वाधिक काळ काँग्रेसची सत्ता होती. २५ वर्ष केंद्र आणि राज्यात काँग्रेसची सत्ता असताना नागपुरातील काँग्रेसचे नेते मंत्रीपदावर होते. या नेत्यांनी नागपूर शहराच्या विकासासाठी काय केले हा प्रश्न आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता असताना काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याआधी नागपूर शहराच्या उत्थानासाठी काय केले, ज्यामुळे ते अभिमानाने सांगू शकतील. अशी बाब त्यांच्याकडे काहीच नाही. परिणामी ते आरोपांचे राजकारण करून जनतेला भ्रमित करण्याचे काम करत आहेत. हिच बाब निर्माणाधीन पुलाच्या घटनेसंदर्भात असून त्यांच्याकडून होत असलेले आरोप पूर्णतः खोटे आणि कुठलेही आधार नसलेले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण जगात कोरोनाचे संकट ओढवले असताना वर्षभर संपूर्ण देशच नव्हे तर जग थांबले होते. लॉकडाऊनमध्ये बांधकाम क्षेत्रातील कामही बंद असल्याने अशा स्थितीत या निर्माणाधीन पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. निर्माणाधीन पुलाचे बांधकाम कार्य पूर्णत्वास आले असते तर ही घटना घडलीही नसती, असेही ऍड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.

 
			


 

 
     
    





 
			 
			
