मुंबई : देशात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (एक देश, एक निवडणूक) यावर एका समितीचे गठण करण्यात आले आहे. याकरिता मोदी सरकारने अचानक संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले.
यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. तसेच मोदी सरकार ‘इंडिया’ आघाडीच्या ताकदीला घाबरल्याने त्यांनी एक देश, एक निवडणुकीचा प्रकार आणला आहे, असा आरोप केला. ते शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काल ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची घेण्याची घोषणा केली. त्याआधी एक निशाण, एक संविधान असंही म्हटलं गेलं. जम्मू-काश्मीरमध्ये काय घडलं? मोदी सरकारने आधी वन नेशन, वन इलेक्शन अंतर्गत तिथं निवडणूक घ्यावी. मणिपूरमध्येही निवडणूक घ्यावी, असा टोला राऊत यांनी लगावला.
राऊत यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली आहे.देशात भ्रष्ट निवडणूक आयोग काम करत आहे. दबावाखाली काम करणारा भ्रष्ट आयोग जोपर्यंत आहे तोपर्यंत देशात निष्पक्ष निवडणुका होऊ शकत नाही. त्यामुळे एक देश, एक निवडणूक हा राजकीय फंडा आहे, असे राऊत म्हणाले.