नागपूर : नागपुरातील कान्हान पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या काद्री परीसरातील योगबार रेस्टॉरंटमध्ये गुंडांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटिव्हीत कैद झाली असून तलवारी आणि काठ्यांसह हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये घुसून तोडफोड केली. तसेच बारमलकाला धमकावून त्याच्यावर हल्ला करत त्याला जिवेमरण्याची धमकी दिली. यादरम्यान कर्मचारी व ग्राहकांनी जीव मुठीत घेऊन आपला जीव वाचवला. याप्रकरणी बार आणि रेस्टॉरंटचे मालक दीनदयाल बावनकुळे यांनी कान्हान पोलीस स्टेशमध्ये तक्रार दाखल केली. कान्हान पोलिसांनी आरोपी गुंडांविरोधात गुन्हा दाखल करत 12 तासांच्या आत त्यांना कळमेश्वर येथून अटक केली आहे.
शैलेश नागपुरे (वय 21,रा.जुनी कामठी), अब्दुल शाहा (वय 33,शांती नगर),मयूर बोरकर(वय 20, कळमना), स्वानील तोलमाजरे(वय 23, जुनी कामठी रोड, कळमना), अभिषेक गोंगणे (वय 25, रामटेक) अशी गुंड आरोपींची नावे आहेत. या गुंडांनी बारमालक बावनकुळेकडून काही रक्कम घेतली तसेच एकूण 1 लाख 52 हजार रुपयांच्या वस्तूंचे नुकसान केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान सदर कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार व अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनात पथकांनी केली.